तरुणांमध्ये राज्यमंत्री भरणे ठरले हिरो! एमपीएससी उमेदवारांची एक वर्षाने वाढली वयोमर्यादा | Educational News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दत्तात्रय भरणे/MPSC
तरुणांमध्ये राज्यमंत्री भरणे ठरले हिरो! MPSC उमेदवारांची एक वर्षाने वाढली वयोमर्यादा

तरुणांमध्ये भरणे ठरले हिरो! MPSC उमेदवारांची वाढली वयोमर्यादा

सोलापूर : राज्य सेवा परीक्षेसाठी (State Service Examination) अर्ज करण्याची मुदत संपली, तरीही मुख्यमंत्र्यांनी स्पर्धा परीक्षेची (Competitive exams) तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या वाढीव संधी तथा वयोमर्यादा वाढीसंदर्भात काहीच निर्णय घेतला नाही. त्यासाठी तरुणांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharne) यांच्याकडे पाठपुरावा केला आणि भरणे यांनी राज्य सरकारच्या माध्यमातून एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून घेतली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची (MPSC) तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये ते दत्तात्रय भरणे हे हिरो ठरले आहेत.

हेही वाचा: उद्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण! परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा

राज्यातील विदर्भ, मराठवाडा येथील लाखो तरुण-तरुणी आई-वडिलांच्या स्वप्नांना यशाचे पंख देण्यासाठी पुणे, मुंबईत येतात. त्यांचे आई-वडील पोटाला चिमटा घेऊन माझा मुलगा अधिकारी होणार म्हणून पैसे पाठवतात. पहिल्या परीक्षेत अपयश आल्यानंतर अपयश ही यशाची पहिली पायरी म्हणून ते पुन्हा जोमाने अभ्यास करतात. दरम्यान, कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांना दोन वर्षात परीक्षाच देता आली नाही. त्यात काहींची वयोमर्यादा संपुष्टात आली. आता रिकाम्या हाताने घरी आल्या पावली परतायचे कसे, अशी चिंता त्यांना सतावत होती. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्री, लोकप्रतिनिधींनी त्या उमेदवारांना वाढीव संधी देण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, कोरोनाची स्थिती सुधारली आणि सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले. तरीही, त्यासंदर्भात कोणताच निर्णय झाला नव्हता. त्यासंदर्भात बुधवारी (ता. 10) राज्यमंत्री भरणे यांनी ही मागणी लावून धरली आणि राज्य सरकारने तसा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक तरुणांनी कॉल व मेसेज करून भरणे यांचे आभार मानले.

खासदार संजय राऊतांचे केंद्राला पत्र, पण...

कोरोनामुळे प्रशासकीय सेवेतून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसमोरील अडचणीत वाढल्या. त्यामुळे त्या युवकांना 'यूपीएससी' परीक्षांसाठी वाढीव संधी द्यावी अथवा वयोमर्यादा वाढवावी, असा प्रश्‍न खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले. त्यानुसार राज्य सरकार दोन वर्षापर्यंत तथा दोन वाढीव संधी देण्याचा निर्णय घेऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राज्य सरकारने निर्णय न घेतल्याने अनेक तरुण निराशेच्या गर्तेत होते. त्यांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळाला आहे.

हेही वाचा: 14 नोव्हेंबरला होणाऱ्या UPSC NDA (2) परीक्षेची केंद्रे जाहीर!

मुख्यमंत्र्यांना दोनदा पाठविले पत्र

कोरोनामुळे राज्यातील लाखो तरुणांना महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देता आल्या नाहीत. या काळात अनेकांची वयोमर्यादा संपली असून त्यांना वाढीव संधी द्यावी, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोनवेळा पाठविले होते. दुसरीकडे, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही त्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश आले आणि कॅबिनेटमध्ये त्याचा निर्णय झाला.

loading image
go to top