उद्या साडेदहा वाजता राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण! परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा | Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण! परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा
उद्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण! परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा

उद्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण! परीक्षार्थींना लोकल प्रवासाची मुभा

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : केंद्र शासनाच्या (Central Government) माध्यमातून शुक्रवारी (ता. 12) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (National Achievement Survey) केले जाणार आहे. त्यासाठी राज्यातील तिसरी, पाचवी, आठवी व दहावीतील दोन लाख 34 हजार 55 विद्यार्थी या चाचणीसाठी बसणार आहेत. राज्यातील निवडक अशा सात हजार 330 शाळांमधील ते विद्यार्थी असणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी प्राथमिक व माध्यमिक शाळा भरतील, असे शालेय शिक्षण विभागाने (Department of School Education) स्पष्ट केले आहे.

हेही वाचा: डिसेंबर-जानेवारीत महाविद्यालयांची ऑफलाईन परीक्षा !

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात काही निवडक शासकीय, खासगी, अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित प्राथमिक व माध्यमिक शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांमधील तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचे गणित, भाषा, विज्ञान, परिसर अभ्यास तथा समाजशास्त्र या विषयांची दोन तासांची चाचणी होणार आहे. त्यानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विद्यार्थी व शिक्षकांना चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुंबई उपनगर, बृहन्मुंबई, ठाणे या शहरातील विद्यार्थ्यांना परीक्षेला सहजपणे जाता यावे म्हणून लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तत्पूर्वी, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिवांचा अभिप्राय घेण्यात आला. त्याला मुख्य सचिवांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता मुंबई उपनगर, बृहन्मुंबई, ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चाचणीसाठी लोकलमधून शाळेपर्यंत जाता येणार आहे. मात्र, त्यांच्या सोबत जाणाऱ्या पालकांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, अशी अट घालण्यात आली आहे.

चाचणीचे स्वरूप...

तिसरीच्या मुलांना भाषा, गणित, परिसर अभ्यासावर आधारित 47 प्रश्‍नांची उत्तरे सोडवावी लागणार आहेत. चार प्रश्‍नसंच असणार असून त्यात प्रत्येक संचात तीन विषयांचे प्रश्‍न असतील. तसेच पाचवीतील विद्यार्थ्यांनाही त्याच पद्धतीने प्रश्‍नसंच दिले जातील. आठवीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर आधारित 60 प्रश्‍न सोडवावे लागतील. प्रत्येक प्रश्‍नसंचात कोणत्याही दोन विषयांचे 60 प्रश्‍न असतील. तर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान, भाषा, सामाजिक शास्त्र व इंग्रजी विषयांचे चार प्रश्‍नसंच दिले जातील. त्यातील प्रश्‍नसंख्या 70 असेल. प्रत्येक संचात कोणत्याही दोन विषयांचे 70 प्रश्‍न असतील. चाचणीचा कालावधी दोन तासांचा (सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत) असणार आहे.

हेही वाचा: आयआयटी मद्रासमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदांची होतेय भरती !

ठळक बाबी...

  • तिसरी, पाचवी, आठवी व दहावीतील विद्यार्थ्यांचे 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण

  • राज्यातील सात हजार 330 शाळांमधील दोन लाख 34 हजार 55 विद्यार्थी देणार चाचणी

  • ऑफलाइन परीक्षेचा वेळ दोन तासांचा; जिल्हाधिकाऱ्यांचा राहणार विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वॉच

  • बृहन्मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी

  • विद्यार्थ्यांसोबत लोकलमधून प्रवास करणाऱ्या पालकांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे बंधनकारक

loading image
go to top