
युक्रेन सरकारनं परवाना परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय.
विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; परीक्षेशिवाय मिळणार MBBS ची पदवी
नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील (Russia-Ukraine War) संघर्ष अद्याप सुरुच आहे. त्यामुळं युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून खूप अस्वस्थ आहेत. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध केव्हा संपेल आणि भारतातील विद्यार्थी पुन्हा तिथं कधी परततील याबद्दल काहीही सांगता येत नाहीय. मात्र, यादरम्यान तिथं शिकणाऱ्या एमबीबीएसच्या (MBBS) विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. युक्रेन सरकारनं अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना (MBBS Students) परीक्षेशिवाय पदवी देण्याचा निर्णय घेतलाय.
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तपत्रानुसार, युक्रेन सरकारनं (Ukraine Government) परवाना परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. आता या परीक्षेशिवाय विद्यार्थ्यांना एमबीबीएसची पदवी मिळणार आहे. युक्रेनमध्ये मेडिकल आणि फार्मसी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे दोन परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. या परीक्षेला KROK-1 आणि KROK-2 असं नाव देण्यात आलंय. वैद्यकीय विद्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षी KROK-1 परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. तर, शेवटच्या म्हणजे चौथ्या वर्षी त्यांना KROK-2 मध्ये उत्तीर्ण व्हायचं असतं. त्यानंतरच त्यांना अंतिम पदवी दिली जाते.
हेही वाचा: PHOTO : रशियातलं खेडेगाव बनलं अस्वलांचं 'घर'
युक्रेनमधील KROK परीक्षा रद्द
युक्रेनच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केलेल्या अधिसूचनेनुसार, KROK-1 पुढील वर्षापर्यंत रद्द करण्यात आलीय. तर KROK-2 परीक्षा या वर्षासाठी रद्द केली गेलीय. पश्चिम बंगालमधील सुधाज्योती सिंघा या विद्यार्थिनीनं सांगितलं की, ही विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी आहे. कारण, बंगालमध्ये एकूण 13 विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत, असं ती म्हणाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत 20,000 हून अधिक भारतीय नागरिकांना युक्रेनमधून बाहेर काढण्यात आलंय.
Web Title: Final Year Students Will Get Mbbs Degree Without Examination Ukraine Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..