कौशल्यपूर्ण संभाषणासाठी...

हल्लीच्या काळात इतर कोणत्याही कौशल्यांपेक्षा सामाजिक कौशल्ये वाढविणे आवश्‍यक आहे. या युगात तुमचा जनसंपर्क म्हणजेच तुमचे ‘नेटवर्क’ हीच मोठी संपत्ती समजली जाते.
skillful conversation
skillful conversationsakal

- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस

हल्लीच्या काळात इतर कोणत्याही कौशल्यांपेक्षा सामाजिक कौशल्ये वाढविणे आवश्‍यक आहे. या युगात तुमचा जनसंपर्क म्हणजेच तुमचे ‘नेटवर्क’ हीच मोठी संपत्ती समजली जाते. मात्र, हा जनसंपर्क वाढविण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे असते ते चांगले बोलणे. तुम्ही अनोळखी लोकांशी कशा प्रकारचे संभाषण करता? यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात.

कल्पना करा की, तुमच्या मित्राने तुम्हाला एका मोठ्या समारंभात निमंत्रित केले आहे. त्यात अनेक मोठे नेते, उद्योजक, गुंतवणूकदार अशी विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे आहेत. अशा वेळी नेमके काय बोलावे? संभाषण कसे करावे? असा प्रश्‍न पडतो. खरं म्हणजे, अशा वेळी होणारे संभाषण ही खूप मोठी संधी असते. त्यातून अनेक चांगल्या ओळखीही होऊ शकतात. चला तर, जाणून घेऊया की, कोणत्याही प्रसंगात उत्तम संभाषण करण्याच्या काही सोप्या टिप्स -

  • खरीखुरी दाद द्या : तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीला मनापासून आणि खरी दाद द्या. मग ते एखाद्या व्यक्तीचे सादरीकरण असो, पोशाख असो किंवा एखाद्या व्यक्तीशी बोलताना जाणवलेली सकारात्मकता असो. मनमोकळी दाद प्रत्येकाला आवडते.

  • छंद, आवड : समोरच्या व्यक्तीचे छंद, आवड-निवड यांच्याबद्दल जाणून घ्या. समोरच्याच्या आवडीच्या गोष्टी किंवा छंद तुमच्याशी जुळल्यास बोलण्यासाठी एक धागा मिळतो. त्याद्वारे मैत्रीही होऊ शकते.

  • कार्यक्रमावर टिप्पणी : तुम्ही ज्या कार्यक्रमात आहात, तेथील नियोजन, हॉल, व्यवस्था यांबाबत बोला. एखादा हलका-फुलका विनोद करा किंवा निरीक्षण मांडा. यामुळे गप्पांना सुरुवात होते.

  • एकमेकांच्या ओळखी/संपर्क : समोरच्या व्यक्तीशी बोलताना समान ओळख किंवा संपर्क काढता येतो का, याचा विचार करा. ही ओळख केवळ व्यक्तीच असते, असं नाही, तर शाळा, शहर, एखादा समूह, संस्थादेखील असू शकते. याशिवाय मित्र-मंडळी किंवा नातेवाइंकामधूनही परस्पर ओळखीचे लोक भेटतात. त्यामुळे एक ‘कनेक्शन’ तयार होते.

  • मदतीची विचारणा : कोणत्याही कार्यक्रमात ‘काही मदत करू का?’ असे स्वतःहून विचारा. मदत म्हणजे दर वेळी खूप मोठीच गोष्ट केली पाहिजे असे नाही. एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगाचा फोटो, व्हिडिओ काढणं, महत्त्वाचा संपर्क क्रमांक देणं हीसुद्धा मदत ठरू शकते.

  • जाणून घ्या : प्रत्येकाला आपले छंद, काम, अभ्यास, करिअर याबद्दल बोलायला आवडतं. त्यामुळे असे प्रश्‍न तुम्ही विचारू शकता.

  • यशाचे रहस्य : समोरच्या व्यक्तीला त्याच्या यशाचे रहस्य विचारा. यासोबतच त्याची आवडती पुस्तके, पॉडकास्ट याबद्दलही विचारता येते.

  • सल्ला किंवा मत : तुमच्या कामाविषयी समोरच्या व्यक्तीचा सल्ला घ्या किंवा मत मागा. अगदी पुस्तके, चित्रपट, पर्यटनस्थळे यांबाबतही समोरच्याचे मत विचारात घेता येते.

  • स्नेहसंमेलने : कौटुंबिक किंवा मित्रांचे स्नेहसंमेलन कधी घेता येईल? यावर चर्चा करा. त्याच्या नियोजनाची जबाबदारी घ्या.

  • स्वानुभव : स्वतःचे सकारात्मक अनुभव, विनोदी किस्से वगैरे इतरांना सांगा.

व्यावसायिक कार्यक्रमांमध्ये खालील प्रकारे संभाषणाची सुरुवात होऊ शकते -

  • उद्देशातून संभाषण : तुमचे व्यावसायिक उद्देश सांगून ते साध्य करण्यासाठी एकमेकांशी चर्चा करा. कल्पना व अनुभवांची देवाण-घेवाण करा.

  • चालू घडामोडी : उद्योगातील किंवा क्षेत्रातील चालू घडामोडी, महत्त्वाच्या घटना, निर्णय यांबाबत चर्चा करा.

  • यशस्वी घोडदौड : तुम्हाला नजीकच्या काळात मिळालेल्या यशाबद्दल किंवा यशस्वी झालेल्या प्रकल्पाबद्दल सांगा.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, संभाषण करताना समोरच्याचे बोलणे शांतपणे ऐका, त्याला वेळोवेळी दाद द्या. तुमची देहबोली सहज व सकारात्मक ठेवा. प्रभावी संभाषण कसे करावे हे जाणून घेण्यासाठी pranjal_gundesha या इन्स्टाग्राम हॅन्डलला किंवा द इंटेलिजन्स प्लसच्या यू-ट्युब चॅनेलला भेट द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com