Education News : ना एसटी, ना पोस्ट, तरीही पोचतं पुस्तक!

गीतेवाडीतील विद्यार्थ्यांना लागली वाचनाची गोडी
Education News
Education News

पुणे : नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्याच्या हद्दीतील शेवटच अन्‌ डोंगराच्या कुशीत असणार गीतेवाडी गाव. खरंतर गावात ना एसटी जाते, ना पोस्ट मास्तर येतो, ना बाजार भरतो, ना आरोग्याची सुविधा पोचते!! हे सगळं नसलं तरीही गावातल्या मुलांना एक गोष्ट मात्र हमखास मिळते ती म्हणजे ‘वाचनाची शिदोरी’. या गावात मुलांना वाचायला नवनवी पुस्तके आणि भरपूर साहित्य उपलब्ध होत आहे.

गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमुळे हे सर्व शक्य झाले आहे. ‘‘आम्ही शाळेत आलो की आमच्यासमोर भरपूर पुस्तके मांडलेली असतात. एक-एक पुस्तक आम्ही प्रथम पाहतो. पुस्तकावरील चित्र आवडले की आपोआप पुस्तक हातात येते. शाळेत पुस्तक वाचतो किंवा घरी नेऊन एक-दोन दिवसात वाचून संपवितो,’’ असा अनुभव इयत्ता चौथीत असणाऱ्या समृद्धी गिते हिने सांगितला.

नगर आणि पाथर्डी तालुक्याच्या हद्दीच्या सीमेवर डोंगराच्या कुशीत असणारे गीतेवाडी (ता. पाथर्डी) हे गाव. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गीतेवाडी. साधारणतः: ७५० लोकसंख्येच्या या गावात अशिक्षितांची संख्या सर्वाधिक असली तरी शाळेच्या ग्रंथालयात मात्र त्यापेक्षा दुप्पट पुस्तके आहेत.

‘इच्छा तिथे मार्ग दिसतो,’ असे प्रत्यक्षात उतरविणारे शाळेचे शिक्षक तुकाराम अडसूळ म्हणतात, ‘‘आमची दोन शिक्षकी शाळा आहे. गावात इतर कोणत्याही सुविधा नसल्या तरी शाळेत सुसज्ज ग्रंथालय असावे, असे ठरविले होते. सुरवातीला गोष्टींची छोटी-छोटी पुस्तके आणली. सुरवातीला चित्रमय पुस्तके आणली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची १० ते २० पानी पुस्तके मुलांसमोर ठेवली. मुखपृष्ठावरील चित्र पाहून विद्यार्थ्यांनी पुस्तके हाताळायला सुरवात केली.

हळूहळू इतर पुस्तके आणून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली. कोरोना काळात ‘ग्रंथालय विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम शाळेमार्फत राबविण्यात आला. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी दररोज ग्रंथालय हे खुले असते आणि विद्यार्थ्यांनी किमान एक तास तरी वाचावे यासाठी प्रोत्साहन दिले जाते.’’

पालकांच्या हातीही पुस्तक

शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके घरीही वाचायला नेता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच त्यांची भावंडे, आई-वडील यांनाही ही वाचायला आवडू लागल्याचे सांगत अडसूळ यांनी समाधान व्यक्त केले. ‘‘आम्ही शाळेतून आणलेल्या पुस्तकाकडे घरातल्यांचे लक्ष जाते आणि तेही पुस्तक हातात घेतात,’’ असे समृद्धीने सांगितले.

ग्रंथालयात असा झाला संग्रह

  • पुस्तकांच्या खरेदीसाठी लोकसहभाग ठरला महत्त्वपूर्ण

  • माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, पालक यांच्या सहभागातून आणली नवीन पुस्तके

  • लग्न समारंभ, मेळावे अशा सामुदायिक कार्यक्रमाच्या खर्चातून शाळेला भेट म्हणून मिळाली पुस्तके

आठवड्यात एक दिवस ‘दप्तरमुक्त शाळा’

मुलांना हवे तितक्या वेळ वाचता यावे, म्हणून आठवड्यातील एक दिवस खास वाचनासाठी दिला जातो. त्यासाठी शनिवारी ‘दप्तरमुक्त शाळा’ भरविली जाते. या दिवशी ग्रंथालयात विद्यार्थ्यांसमोर पुस्तके प्रदर्शन स्वरूपात मांडली जातात. मुलांना हवी ती पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात. ग्रंथालयात कोणत्याही कोपऱ्यात किंवा मित्र-मैत्रिणींसमवेत एकत्र बसून वाचनाचा आनंद विद्यार्थी घेतात.

मुलांना वाचनाची आवड निर्माण झाल्यास त्यातून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो. त्यामुळे वाचनाची गरज लक्षात घेऊन शाळेतील दोन वर्गांमध्ये ग्रंथालय साकारले आहे. ‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रमांच्या दिवशी कवायत, योगासने घेतली जातात आणि त्यानंतर संपूर्ण वेळ वाचनासाठी दिला जातो. महिन्यातून एक विद्यार्थी किमान पाच पुस्तके वाचतो.’’

- तुकाराम अडसूळ, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गीतेवाडी

मला वाचायला खूप आवडते. वाचनाच्या तासाला हवे ते पुस्तक हातात घेऊन ते वाचता येते. शाळेत पुस्तक वाचताना सर मदत करतात. आई-वडील दोघेही शेती करतात. घरी पुस्तक नेले की त्यांच्यासमोर मोठ्याने पुस्तक वाचून दाखवायला मज्जा येते.

- वैष्णव पोटे, विद्यार्थी, इयत्ता चौथी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com