मानसशास्त्रात करा उज्ज्वल करिअर

मनाचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीशी आणि विचारांशी आहे. मनाचा ठाव लागत नाही, असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीची मानसिकता वेगळी असते.
psychology
psychologysakal

- प्रा. विजय नवले, करिअरतज्ज्ञ

मनाचा संबंध आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येक कृतीशी आणि विचारांशी आहे. मनाचा ठाव लागत नाही, असे म्हटले जाते. प्रत्येक व्यक्तीची मानसिकता वेगळी असते. अशा मनाचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो. कोणालाही कधीही मानसिक त्रास होऊ शकतो. गोंधळ उडू शकतो. त्यामुळेच आजच्या धावपळीच्या युगात मानसशास्त्र, समुपदेशन हे अधिक ‘स्कोप’ असलेले करिअर ठरत आहे.

पदवी

मानसशास्त्रातील करिअरसाठी बीएससी किंवा बीए मानसशास्त्राचा विचार विद्यार्थी करू शकतात. बायोलॉजीसह बारावी सायन्स झालेला विद्यार्थी बीएससी सायकॉलॉजी करू शकतात. बारावी आर्टस् उत्तीर्ण विद्यार्थी बीए सायकॉलॉजीसाठी (मानसशास्त्र) प्रवेश घेऊ शकतात.

या दोन्ही पदव्यांचा कालावधी तीन वर्षांचा आहे, परंतु काही विद्यापीठांमध्ये नव्याने अभ्यासक्रम ठरवताना चार वर्षे कालावधी नियोजित केलेला आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी वेगळी अशी सीईटी परीक्षा नाही. बारावीच्या गुणांवरच प्रवेश दिले जातात. मोजक्या महाविद्यालयांत यासाठी संस्था स्तरावर प्रवेशपरीक्षा असू शकते.

विषय

वर्तन, मानसिक आरोग्य, बौद्धिक क्षमता, न्यूरोफिजिऑलॉजी, बायोफिजिऑलॉजी, सोशल इंटरॅक्शन्स, विकृती, बालमानसशास्त्र, शालेय विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र, समुपदेशनाच्या पद्धती आदी विषय बीएससीमध्ये असतात. अशाच पद्धतीचे विषय बीएमध्ये असतात.

जसे की, सामाजिक मानसशास्त्र, भावनिक वाढ, विकृती, शैक्षणिक क्षेत्रातील मानसशास्त्राचा वापर, समुपदेशन, मानसिक आरोग्य आदी विषय विद्यार्थी अभ्यासतात. बीए मानसशास्त्र सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भावर लक्ष केंद्रित करते, तर बीएससी मानसशास्त्र जैविक आणि न्यूरल पैलूंवर जोर देते. दोन्ही पदवी अभ्यासक्रमांत प्रात्यक्षिके आहेत.

समुपदेशकाची गरज

सध्याच्या काळात शालेय विद्यार्थी, पौगंडावस्थेतील विद्यार्थी, करिअर निवडीसंदर्भातील विद्यार्थी आणि पालक, कौटुंबिक अडचणींमधील प्रसंग, पालकत्व, नोकरी-व्यवसाय करताना येणाऱ्या समस्या, वृद्ध, पीडित आणि शोषित सामाजिक घटक, अपघात किंवा आजाराने ग्रस्त व्यक्ती अशा सर्वांनाच समुपदेशनाची गरज भासते.

यातील काही समुपदेशनात संवादाच्या माध्यमातून मार्ग सापडतो, तर काही ठिकाणी सातत्याने मार्गदर्शनाची, मानसिक उपचारांची गरज भासते. मन मोकळे होण्यापासून सल्ला, मार्गदर्शन, मानसिक व्यायाम अशा अनेक उपायांनी उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो.

करिअरचा स्कोप

विभक्त कुटुंबपद्धती, व्यक्तिकेंद्रित व्यवस्था, मोबाईलपासून अनेक यंत्रांचा मानवी जीवनातील वाढता हस्तक्षेप, पैसाकेंद्रित समाजरचना, एकलकोंडेपणा, हिंसकवृत्ती अशा अनेक कारणांमुळे हल्ली माणसांना मानसिक समस्या निर्माण होत आहेत. सहजपणे मार्गदर्शन न झाल्यामुळे काही ठिकाणी या समस्यांची परिसीमा गाठली जाते आणि त्यामुळे अत्यंत टोकाच्या गोष्टी घडताना दिसतात.

या परिस्थितीत समुपदेशकाची भूमिका मोठी महत्त्वाची आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात समुपदेशकांची गरज निर्माण होत आहे. म्हणूनच मानसशास्त्रीय विषयातील शिक्षण आणि प्रशिक्षण झालेलया तज्ज्ञांना चांगला स्कोप आहे.

क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, न्यूरोसायकॉलॉजिस्ट, मेडिकल सायकॉलॉजिस्ट, सायकोथेरपीस्ट अशा कामांसाठी हे पदवीधर पात्र असतात. शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स , क्लिनिक्स, कॉर्पोरेट सेक्टर, स्पोर्ट्स क्लब यांमध्ये हे तज्ज्ञ नोकरी करू शकतात. स्वतः चे समुपदेशन केंद्र चालवू शकतात. संशोधन, लेखन, प्रबोधन, मेन्टॉरिंग, लाईफ कोच, मोटिव्हेशनल स्पीकर अशा अनेक भूमिका निभावू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com