HSC Maths Paper Leak : पेपर फुटीतील आरोपींना ५ दिवसाची पोलीस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Maths Paper Leak Accused in police custody for 5 days education

HSC Maths Paper Leak : पेपर फुटीतील आरोपींना ५ दिवसाची पोलीस कोठडी

देऊळगाव राजा : सिंदखेडराजा तालुक्यात १२ वी गणिताचा पेपर फुटी प्रकरणात साखरखेर्डा पोलिसानी ताब्यात घेत अटक केलेल्या पाच आरोपींना आज (ता.५) देऊळगाव राजा न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. राज्यभर गाजलेल्या पेपर फुटीच्या सदर प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वरतविण्यात येत आहे.

१२ वी गणिताचा पेपर सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदरच फुटला होता. साखरखेर्डा पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर ५ आरोपी निष्पन्न झाले. त्यात २ खाजगी शाळेवरील शिक्षक व ३ ईतर आढळून आले आहेत. उप विभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार नंदकिशोर काळे आणि पोहेकॉ निवृत्ती पोफळे करीत आहेत. दरम्यान काल ता.४ चे रात्री ११.२५ चे दरम्यान आरोपींची आरोग्य तपासणी करून ५ ही आरोपींना अधिकृत अटक केली.

त्यामध्ये गणेश शिवानंद नागरे (३०), पवन सुधाकर नागरे(२३) आणि गणेश बद्रीनाथ पालवे तिघेही रा.भंडारी तर गोपाल शिंगणे(३०) रा.शेंदूर्जन व गजानन आडे(३५) रा. किनगावजट्टू या पाच जणांना अटक करून रविवारी देऊळगाव राजा न्यायालयासमोर उभे केले.

सदर प्रकरणात सहाय्यक सरकारी व अभियोक्ता अनिल शेळके यांनी सरकारतर्फे भरीव युक्तिवाद केला. न्यायालयाने सर्व आरोपींना (पाच दिवसाची) १० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आरोपितांमध्ये गोपाल शिंगणे व गजानन आडे हे दोन आरोपी खाजगी शाळेवरील शिक्षक असून ३ आरोपी हे भंडारीचे आहेत.

आरोपींवर परीक्षा गैरव्यवहार अधि.१९८२ कलम ५,६ अन्वये कारवाई करण्यात आली असून पोलीस चौकशी अंती आणखी आरोपींचा समावेश होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिस प्रमुख सूत्रधाराच्या शोधात असून यात बीबी ता.लोणार कनेक्शन असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान गणिताच्या पेपर अगोदर ही फुटले आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू असून १२वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेला एक गोपनीय ग्रुप तयार करण्यात आला होता व या ग्रुप वर गणिताचा पेपर अर्ध्या तासापूर्वी व्हायरल करण्यात आल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

टॅग्स :HSC Board Examination