
HSC Exam : बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमधील त्रुटी असणाऱ्या प्रश्नांबाबत राज्य मंडळाचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाच्या पेपरमधील त्रुटींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील संबंधित त्रुटी असलेला प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे एकूण सहा गुण देण्यात येणार आहेत.
फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर होता. या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत कवितेवर आधारित प्रश्नात ए-३ आणि ए-५ क्रमांकाचे प्रश्न राज्य मंडळाकडून छापण्यात आले नव्हते.
तर ए-४ क्रमांकाच्या प्रश्न विचारण्याऐवजी त्याठिकाणी उत्तर छापण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत झालेल्या छपाईतील चुकीबाबत राज्य मंडळाने यापूर्वीच दिलगिरी व्यक्त केली आहे.
दरम्यान, पेपरमधील त्रुटीबाबत नियामक मंडळाच्या अहवालानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे राज्य मंडळाने जाहीर केले. परंतु कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहिष्कारामुळे नियामक मंडळाची बैठक गेल्या ११ दिवसांत होऊ शकली नाही.
शिक्षणमंत्र्यांसमवेत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतला. त्यानंतर इंग्रजी विषयाच्या पेपरबाबत प्रमुख नियामकांची सभा घेण्यात आली. परीक्षेतील प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाची संयुक्त सभा विषय तज्ञ आणि सर्व विभागीय मंडळाचे प्रमुख नियामक यांच्या समवेत गुरुवारी झाली.
इंग्रजी प्रश्नपत्रिकेमध्ये त्रुटी, चुका आढळून आल्या असल्याचे इंग्रजी विषयाच्या संयुक्त सभेच्या अहवालावरून निदर्शनास आले. या अहवालानुसार त्रुटी असलेल्या प्रश्नांचे गुण विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने देण्याचे, याबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.
त्याप्रमाणे कवितेसंदर्भातील विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत प्रश्नांचा केवळ उल्लेख केला असल्यास, प्रश्नपत्रिकेत चुकलेल्या सेक्शनमधील अन्य कोणतेही प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केल्यास,
किंवा त्रुटी असलेल्या प्रश्नांचे क्रमांक (ए-३, ए-४, ए-५) असे केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केल्यास, या तीन पैकी कोणत्याही एका प्रकारचे लेखन उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केल्यास संबंधित विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे दोन याप्रमाणे एकूण सहा गुण देण्याचा निर्णय घेतला आहे, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.