esakal | CBSE नंतर ICSEने दहावीच्या परीक्षा केल्या रद्द

बोलून बातमी शोधा

ICSE Board
CBSE नंतर ICSEने दहावीच्या परीक्षा केल्या रद्द
sakal_logo
By
वृत्तसंस्था

ICSE Exam 2021 : नवी दिल्ली : देशात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेत सीबीएसईनंतर काउंसिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CICSE)ने आयसीएसई (१०वी) ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. १६ एप्रिलला बोर्डने दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन पर्याय सुचविले होते. एक तर अंतर्गत मूल्यांकनानुसार गुण दिले जातील. आणि दुसरे म्हणजे जे विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नाहीत, त्यांना परीक्षेला बसण्याची संधी मिळेल, पण मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार दहावीची परीक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांची परीक्षा होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. बोर्ड यासाठी पारदर्शक निकष ठरवणार असून त्याआधारे निकाल जाहीर करणार आहे. निकालाची तारीख नंतर जाहीर केली जाईल. आयसीएसई संबंधित शाळांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश द्यावा तसेच त्यांचे शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू करावे, असे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा: पुन्हा आढळले अडीच लाखांपेक्षा जास्त रुग्ण, मृतांच्या संख्येतही वाढ

केंद्रीय शिक्षण मंडळाने आयएससी (१२ वी)च्या परीक्षेसंदर्भात १६ एप्रिलच्या निर्णयामध्ये बदल केलेला नाही. जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मंडळाने म्हटले आहे. पूर्वी निर्धारित करण्यात आलेल्या तारखांनुसार आयसीएसई आणि आयएससीच्या परीक्षा ४ मे २०२१ पासून सुरू होणार होत्या.

सीआयएससीईपूर्वी सीबीएसई बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द केली असून बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. अंतर्गत मूल्यांकनानुसार सीबीएसई बोर्ड दहावीचा निकाल जाहीर करणार आहे. तर १२ वीच्या परीक्षेचा निर्णय १ जून रोजी घेण्यात येणार आहे.

हेही वाचा: फडणवीसांच्या पुतण्याला लस मिळतेच कशी?, काँग्रेसचा सवाल

तसेच तेलंगणा बोर्ड, हरियाणा बोर्ड, ओडिशा बोर्ड, उत्तर प्रदेश बोर्ड, छत्तीसगड बोर्ड, पंजाब बोर्ड, राजस्थान बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड, एमपी बोर्ड यांनीही कोरोनामुळे परीक्षा रद्द केल्या आहेत. सीबीएसईप्रमाणेच हरियाणा बोर्डानेही दहावीची परीक्षा रद्द करण्याचा आणि अंतर्गत मूल्यांकनच्या आधारे निकाल काढण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबने आठवी आणि दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये पाचवी, आठवी आणि दहावीच्या मुलांची परीक्षा न घेता त्यांना पुढील वर्गात ढकलण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुण्यात जनरल मोटर्सने 1419 कामगारांना नोकरीवरुन काढलं

दरवर्षी सुमारे ३ लाख विद्यार्थी आयसीएसई आणि आयएससी परीक्षा देतात. मागील वर्षी आयसीएसईमध्ये २ लाख ७ हजार ९०२ मुलांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी २ लाख ६ हजार ५२५ म्हणजेच ९९.३३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर आयएससीमध्ये ८८ हजार ४०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ८५ हजार ६११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आयएससीचा निकाल ९६.८४ टक्के लागला होता.