इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील इंट्रेस्टिंग करीअर; 'या' आहेत संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

दहावी, बारावी, पदवीचे निकाल जाहीर झाले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांना पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शिक्षणसंधी उपलब्ध आहेत, त्यांची माहिती घेऊयात..

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत गेली अनेक वर्षे ‘सुपर पॉवर’ म्हणून ओळखला जातो आहे. भारतात आज या क्षेत्रात जवळपास चाळीस लाख लोक काम करतात. या क्षेत्रात जाणार्‍यांना मिळणारा भरपूर पगार, परदेशगमनाच्या संधी, व्हाइट कॉलर जॉब, यामुळे या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा फार मोठा ओढा आहे.

दहावी, बारावी, पदवीचे निकाल जाहीर झाले आहेत. या सर्वच विद्यार्थ्यांना पुढे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध शिक्षणसंधी उपलब्ध आहेत, त्यांची माहिती घेऊयात...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

1) दहावीनंतर डिप्लोमा कॉम्प्युटर/आयटी इंजिनिअरिंग :
दहावीनंतर दहावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना तीन वर्षांचा ‘डिप्लोमा कॉम्प्युटर’ किंवा ‘डिप्लोमा आयटी’ या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. यासाठीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. या तीन वर्षांच्या अभ्यासक्रमानंतर डिप्लोमाच्या तिसर्‍या वर्षाच्या मार्कांवर विद्यार्थ्यांना डिग्री कॉम्प्युटर/आयटी इंजिनिअरिंगला प्रवेश मिळू शकतो. मात्र, याकरिता विद्यार्थ्यांना किमान 60 टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. याशिवाय, या विद्यार्थ्यांना बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन) या कोर्सलाही प्रवेश मिळू शकतो.

दहावी, बारावीनंतर पुढे काय? घाबरु नका; करियरसाठी 'या' आहेत नव्या वाटा

2) बारावीनंतर डिग्री कॉम्प्युटर/आयटी इंजिनिअरिंग :
बारावीनंतर सीईटीच्या गुणांवर आधारित पदवी अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये प्रेफरन्स फॉर्म भरताना विद्यार्थी कॉम्प्युटर/आयटी या शाखांना प्राधान्य देऊ शकतात. कॉम्प्युटर व आयटी या दोन्ही इंजिनिअरिंग शाखांमध्ये फारसा फरक नाही, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे. डिग्री इंजिनिअरिंगनंतर मुख्यत्वे कॅम्पस रिक्रूटमेंटमधून कंपन्यांमध्ये नोकरी मिळत असल्याने प्रत्येक सेमिस्टरला सर्व विषयांत प्रथम वर्गात पास होण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा. तसेच, या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमादरम्यान सिस्को, मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट, ओरॅकल असे एखादे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळविण्याचा प्रयत्न करावा.
बारावीच्या ‘मराठी युवकभारती’मध्ये नवे काय? जाणून घ्या...

3) बारावीनंतर बी. एस्सी कॉम्प्युटर सायन्स :
बारावीनंतर बी. एस्सी कॉम्प्युटर सायन्स हा एक चांगला पर्याय शास्त्र शाखेतून बारावी झालेल्या विद्यार्थ्यांकरिता उपलब्ध आहे. या कोर्समध्ये मुख्यत: गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स व ‘सी’ भाषा, यांवर पहिल्या दोन वर्षांत भर असतो; तर तिसर्‍या वर्षी कॉम्प्युटर सायन्सचे विषय असतात. ज्या विद्यार्थ्यांचे गणित चांगले नाही, त्यांना हा कोर्स जड जाऊ शकतो. अनेक सॉफ्टवेअर कंपन्याद्वारे या विद्यार्थ्यांना ‘कॅम्पस रिक्रूटमेंट’द्वारे संधी उपलब्ध आहे. याशिवाय, हे विद्यार्थी पुढे एम. एस्सी कॉम्प्युटर सायन्स हा दोन वर्षांचा किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स हा तीन वर्षांचा कोर्स करू शकतात.

इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग करायचे आहे? 'या' आहेत भविष्यातील संधी 

4) बारावीनंतर बीसीए (बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स) :
बारावीनंतर आर्टस्, कॉमर्स, सायन्स अशा कोणत्याही विद्यार्थ्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग म्हणजे तीन वर्षांचा बीसीए कोर्स. या कोर्समध्ये बिझनेस कम्युनिकेशन, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, मॅनेजमेंट अकाउंटिंग, मटेरिअल्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, यासारखे ‘डोमेन’ ज्ञान देणारे मॅनेजमेंट सायन्समधील विषय असतात. त्याचबरोबर सी, सी प्लस प्लस, जावा, व्हीबी, नेटवर्किंग यासारखे कॉम्प्युटर सायन्समधील विषयही असतात. याशिवाय, गणित व स्टॅटिस्टिक्स हे विषयही असतात. प्रोग्रॅमिंग हा विषयच मुळात गणित, स्टॅटिस्टिक्स, लॉजिक या विषयांशी संंधित असल्याने गणिताशी वाकडे असणार्‍यांनी या कोर्सच्या वाटेला जाऊ नये. विद्यार्थ्यांनी हा कोर्स करता करता रिस्को, मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट, ओरॅकल असे एखादे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविले तर ते खूपच फायदेशीर ठरते. बीसीएनंतर काही कंपन्या ‘कॅम्पस रिक्रूटमेंट’च्या माध्यमातून नोकरी देतात. मात्र, बहुसंख्य विद्यार्थी एमसीए हा तीन वर्षांचा अगर एमबीए वा एमसीएम हा दोन वर्षांचा कोर्स करून मास्टर्स डिग्री मिळवितात.

5) पदवीनंतर ‘मास्टर ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स’ (एमसीए) :
बीसीए/बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स/बीएस्सी आयटी किंवा गणित किंवा स्टॅटिस्टिक्स विषय घेऊन बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या कोणत्याही शाखेच्या पदवीधरांना कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात करिअर करण्यासाठी उपयुक्त असा हा तीन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. महाराष्ट्रातील सुमारे शंभर संस्थांमध्ये यासाठी सहा हजारांहून अधिक जागा आहेत. एमसीएच्या तीन वर्षांत विद्यार्थी मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्सपासून मॅनेजमेंटशी संंधित विषयांपर्यंत आणि हार्डवेअर, डेटाबेस मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंगपासून सी, सी प्लस प्लस, जावा यासारख्या कॉम्प्युटर सायन्समधील विषयांपर्यंत विविधांगी अभ्यास करतात. हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये उत्तम संधी मिळतात. हा कोर्स करता करता विद्यार्थ्यांनी सिस्को, ओरॅकल, मायक्रोसॉफ्ट, रेडहॅट असे एखादे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविले तर नक्कीच फायद्याचे ठरते.

6) पदवीनंतर ‘मास्टर ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट’ (एमसीएम) :
पुणे विद्यापीठातर्फे चालविला जाणारा एमसीएम हा माहिती तंत्रज्ञानातील व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणारा दोन वर्षांचा कोर्स आहे. या कोर्समध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर टेस्टिंग, क्वालिटी मॅनेजमेंट, सॉफ्टवेअर मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयांरोबरच कॉम्प्युटर सायन्समधील आरडीबीएमएस, ओरॅकल, वे टेक्नॉलॉजी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग यासारखे विषयही आहेत. शास्त्र, वाणिज्य, कला यासारख्या कोणत्याही शाखेतून पदवीधर विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स उपलब्ध आहे. आयटी कंपन्यांबरोबरच आयटीईएस कंपन्या, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, बँका अशा विविध क्षेत्रांतही या विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.

7) पदवीनंतर एमएस्सी कॉम्प्युटर सायन्स :
बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असा हा दोन वर्षांचा कोर्स आहे. पहिल्या तीन सेमिस्टर्समध्ये कॉम्प्युटर सायन्स संंधित विषयांचा अभ्यास करावा लागतो, तर चौथ्या सेमिस्टरमध्ये इंडस्ट्रिअल प्रोजेक्ट करावा लागतो.
आयटी क्षेत्रात करिअर करण्यासाठी आयटी कंपनीमध्ये नोकरी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. फ्रेशर्सची बहुतांश रिक्रूटमेंट कॅम्पस रिक्रूटमेंटमधून होते. याकरिता वरीलपैकी कोणताही आयटी कोर्स करताना विद्यार्थ्यांनी काही कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, उत्तम कम्युनिकेशन स्किल यांचा समावेश होतो. त्याचबरोबरीने अ‍ॅप्टिट्यूड टेस्टची प्रॅक्टिस व एखादे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविणे, या दोन गोष्टी फायदेशीर ठरतात.

प्रोग्रॅमिंगशिवाय आयटी क्षेत्रात करिअरचे दोन उत्तम पर्याय आहेत :

1) हार्डवेअर/नेटवर्किंग : प्रत्येक क्षेत्रात कॉम्प्युटरचा शिरकाव झाल्याने कॉम्प्युटर हार्डवेअर असेंब्ली, विक्री, दुरुस्ती, नेटवर्किंग या क्षेत्रांमध्ये करिअरच्या मुबलक संधी निर्माण झाल्या आहेत. रिसेशन फ्री करिअर म्हणून याकडे बघता येईल. कोणत्याही शाखेतून बारावी वा पदवी मिळविलेला विद्यार्थी या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, सिस्को, रेडहॅट यासारखे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रमाणपत्र मिळवून उत्तम करिअर करू शकतो.

2) मल्टिमीडिया अ‍ॅनिमेशन : हल्ली कोणताही सिनेमा वा जाहिरातसुद्धा अ‍ॅनिमेशनशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. मल्टिमीडिया/अ‍ॅनिमेशन क्षेत्रात वेब डिझायनिंग, 2 डी/ 3 डी अ‍ॅनिमेशन यांसारख्या गोष्टींचे सखोल ज्ञान असणार्‍या विद्यार्थ्यांना मुबलक संधी आहेत. मात्र, या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक गुण म्हणजे कलेची आवड, निरीक्षणशक्ती, कल्पकता, सृजनशक्ती व चित्रकलेची आवड व जाण. कोणत्याही शाखेतून शिक्षण घेणारे विद्यार्थी या क्षेत्रातील प्रशिक्षण घेऊन करिअर करू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: interesting career opportunities in information technology