बारावीच्या ‘मराठी युवकभारती’मध्ये नवे काय? जाणून घ्या...

रेणू सुहास तारे
Friday, 12 June 2020

भाषेच्या अध्यापनातील एक अविभाज्य घटक म्हणजे पाठ्यपुस्तक होय. नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नवे काय हे आपण जाणून घेऊ...

जन्मदात्री आणि जन्मभूमी यांना जोडणारा दुवा म्हणजे मातृभाषा होय. मानवी जीवनात मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाषा हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. भाषेच्या अध्यापनातील एक अविभाज्य घटक म्हणजे पाठ्यपुस्तक होय. नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नवे काय हे आपण जाणून घेऊ...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पाठ्यपुस्तकाच्या योग्य उपयोगाने अध्यापनात सुसूत्रता, तर येतेच पण त्याचबरोबर अभ्यासाला योग्य ती दिशाही मिळते. विद्यार्थ्यांना कृतिप्रवण शिक्षण देण्यात अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वाची ठरते. क्षमताधिष्ठित, कौशल्याधिष्ठित व  कृतिप्रवण अभ्यासक्रम हे इयत्ता बारावी ‘’मराठी युवकभारती’चे वैशिष्ट्य आहे. भाषिक व भावनिक विकास, गाभाघटक, जीवनकौशल्ये आणि मूल्यांचा साकल्याने विचार करून पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

‘मराठी युवकभारती’ पाठ्यपुस्तकाचे एकूण सहा भागात विभाजन केले आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागात सहा गद्य घटक व सहा पद्य घटक दिले आहेत. भाग तीनमध्ये ‘कथा’ या साहित्यप्रकाराचा परिचय करून दिला आहे. तसेच त्याला जोडून प्रातिनिधिक स्वरूपात नामवंत कथाकारांच्या दोन कथा दिलेल्या आहेत. भाग चार ‘उपयोजित मराठी’ या भागामध्ये  ‘मुलाखत’, माहितीपत्रक’, ‘अहवाल’ आणि ‘वृत्तलेख’ या घटकांचा समावेश केला आहे. भाग पाचमध्ये ‘व्याकरण व लेखन’ यात व व्याकरण भागात वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार यांचा समावेश आहे, तर लेखन भागात निबंधाचा अंतर्भाव केला आहे. भाग सहामध्ये परिशिष्टे अंतर्गत पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्प्रचार यांचा समावेश आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणारा वेळ लक्षात घेवून पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे. वाड़मयातील विविध प्रकार व नव्या-जुन्या साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पाठ्यपुस्तकातून केला आहे. निवडलेले पाठ, कविता व कथा हे विषयाच्याच नाही, तर भाषेच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. पाठ्यपुस्तकातील नमुना गद्य आकलनासाठी  उत्कृष्ट जातिवंत गद्य उताऱ्याची निवड केली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, कृतीप्रधान अभ्यासक्रमातून  विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित करणे हे ‘उपयोजित’ भागाचे सूत्र आहे. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा वापर त्यांना व्यवसायाभिमुखतेबरोबरच आत्मनिर्भरतेकडे घेवून जाणारा आहे. आजमितीस विविध व्यवहारक्षेत्रे व सेवाक्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भविष्यात ही क्षेत्रे आणखी व्यापक होणार आहेत. यातून उपजीविकेच्या अनेकविध संधींचा फायदा घेणे, त्यासाठी सक्षम होणे क्रमप्राप्त आहे. आजच्या काळातील कौशल्याचे महत्त्व लक्षात घेता स्वतःच्या ठायी असणार्‍या कौशल्याचा जाणीवपूर्वक विकास करणे अनिवार्य आहे. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे या क्षेत्रातील संधींचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम करावे. उपयोजित विभागातील मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल व वृत्तलेख हे घटक व्यवसाय वा नोकरीमधील भूमिकेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारावीच्या मूल्यमापन पद्धतीत विचार प्रवर्तक कृती व आशयाच्या आकलनावर भर दिलेला आहे. पाठाखालील कृती अशा खुबीने आणि दूरदृष्टीने दिल्या आहेत की त्या सोडविताना विद्यार्थ्यांच्या सृजनशील व चिकित्सक विचाराचा प्रत्यय येणार आहे. पाठाखालील कृती केवळ ज्ञानावर आधारित नसून अभिव्यक्ती व उपयोजनाचाही त्यात बारकाईने विचार केलेला आहे. इयत्ता बारावीचा नवीन अभ्यासक्रम कृतीप्रधान आहेच पण त्याचबरोबर तो जीवनकौशल्यावर आधारित व अनुभवकेंद्री आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आजचा विद्यार्थी तंत्रस्नेही आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची अभ्यासाची जोड कशी द्यावी याचे मार्गदर्शन शिक्षक व पालक यांनी जरूर करावे. विषयाचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन तसेच अवांतर वाचन महत्त्वाचे ठरणार आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह आपोआप वाढेल व त्याचा फायदा त्यांना निबंध लेखन, स्वमत, अभिव्यक्ती यासारख्या कृती अभ्यासताना होईल. व्याख्याने, आंतरजालावरील लिंक्स, व्हिडिओज, यू-ट्यूब व प्रसारमाध्यमे यासारख्या दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले श्रवण, वाचन व भाषणाचे क्षेत्र वाढवता येईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बारावीच्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर, आकलनशक्तीची पातळी, भाषिक ज्ञान नजरेसमोर ठेवून पाठ्यपुस्तक दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तक ग्रामीण आणि नागरी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपलेसे वाटेल असेच आहे. भाषेच्या पाठ्यपुस्तका बद्दल विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या व समाजाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षेला पाठ्यपुस्तक नक्की उतरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know more about Marathi Yuvakbharati Books of 12th Class