esakal | तब्बल 30 वेळा अपयश आलं पण खचला नाही, IPS अधिकाऱ्याची संघर्षगाथा
sakal

बोलून बातमी शोधा

IPS Aditya Kumar

युपीएससीमध्ये यश मिळवण्याआधी त्यांना जवळपास 30 परीक्षांमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलं.

तब्बल 30 वेळा अपयश आलं पण खचला नाही, IPS अधिकाऱ्याची संघर्षगाथा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयपूर - अभ्यास, जिद्द, चिकाटी हे शब्द अनेकदा ऐकायला बरे वाटतात पण जेव्हा अपयश येतं तेव्हा माणसाची खरी कसोटी असते. परीक्षेत नापास झालेल्यांना पुन्हा आत्मविश्वासाने वाटचाल करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. एक दोनदा अपयश आलं तर पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. पण या अपयशालासुद्धा काही मर्यादा असते का? कितीवेळा अपयश यावं आणि पुन्हा सुरुवात करावी? असे प्रश्नही पडतील. राजस्थानातील एका लहानशा गावात राहणाऱ्या आयपीएस आदित्य यांचा संघर्ष अपयश आलेल्यांसाठी प्रेरणा देणारा आहे. 

राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातील एका गावातल्या आदित्य कुमार यांचा आयपीएस होण्याचा प्रवास खूप संघर्षाने भरलेला आहे. अभ्यास करत असताना सुरुवातीला अडचण आली ती इंग्रजीची. इंग्रजी भाषा चांगली नसल्यानं त्यांनी हिंदीतून युपीएससी देण्याचा निर्णय घेतला. युपीएससीमध्ये यश मिळवण्याआधी त्यांना जवळपास 30 परीक्षांमध्ये अपयशाला सामोरं जावं लागलं. यामध्ये बँकिंग, शिक्षक, इंजिनिअरिंग, राजस्थानच्या प्रशासकीय सेवेच्या परीक्षांचा समावेश होता. युपीएससीमध्येही त्यांना तीनवेळा अपयश आलं. मात्र चौथ्यावेळी त्यांनी आतापर्यंतच्या सर्व अपयशांवर मात करत यश मिळवलं. 

हे वाचा - तीन IAS बहिणींचा सेम प्रवास; भूषवलं एकाच राज्याचं मुख्य सचिव पद

आदित्य यांनी त्यांच्या प्रवासाबद्दलं बोलताना सांगितलं की, बारावीला त्यांना 67 टक्के गुण मिळाले होते. गावातच शिकल्यानं इंग्रजीचा अभ्यास थोडा कमीच होता. तेव्हा इंग्रजी पेपर वाचायला सुरुवात केली. पूर्ण पेपर वाचायला सहा तास लागायचे. तेव्ही इंग्रजीची भिती मनात बाळगली नाही. हिंदीची काहीच अडचण नव्हती. ज्यांना वाटतं की इंग्रजी जमत नाही म्हणून काहीच जमणार नाही. तर असा विचार कऱणं चुकीचं आहे. 

युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी आदित्य 2013 मध्ये दिल्लीला आले. तिथं त्यांनी तयारी सुरु केली. पहिल्या तीन प्रयत्नात अपयश आलं मात्र 2017 मध्ये हिंदीतून युपीएससीची परीक्षा दिली आणि 630 वी रँक मिळवली. त्यांना पंजाब कॅडर मिळाली आणि पहिल्यांदा पोस्टिंग संगरुर इथं एएसपी म्हणून झालं. आदित्य म्हणतात की. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ते पंजाबमध्ये आले. तिथली परिस्थिती बदलायची आहे. ड्रग्सच्या विळख्यात सापडलेले तरुण त्यांच्या भविष्याचा विचार करत नाहीत. त्यांना या विळख्यातून सोडवायचं आहे. 

हे वाचा - एक हजार वर्षांचा इतिहास असलेलं ऑक्सफर्ड; जगातल्या दिग्गजांनी घेतलंय शिक्षण

सातत्याने अभ्यास करत असतानाही यश हुलकावणी देत होतं. अनेक परीक्षांमध्ये नापास झाल्यावर मित्रांनी आणि नातेवाइकांनी मिळेल ती नोकरी कर असं सांगितलं. पण त्याचवेळी वडील आणि शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं. आदित्य म्हणतात की, आयुष्यात नकारात्मकता दूर ठेवा. प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. सध्या आदित्य हैदराबादमधल्या नॅशनल पोलिस अकादमीत दुसऱ्या टप्प्यातील ट्रेनिंग घेत असून ते सप्टेंबरमध्ये पुन्हा कर्तव्यावर रुजू होतील.