esakal | एक हजार वर्षांचा इतिहास असलेलं ऑक्सफर्ड; जगातल्या दिग्गजांनी घेतलंय शिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

oxford university

इंग्लंडचे आतापर्यंत 27 पंतप्रधान ऑक्सफर्डचे माजी विद्यार्थी आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हेसुद्धा ऑक्सफर्डचे माजी विद्यार्थी होते.

एक हजार वर्षांचा इतिहास असलेलं ऑक्सफर्ड; जगातल्या दिग्गजांनी घेतलंय शिक्षण

sakal_logo
By
सूरज यादव

लंडन - जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटात इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला वॅक्सिन तयार करण्यामध्ये यश आलं आहे. दुसऱ्या टप्प्यात झालेल्या लशीच्या परीक्षणामध्ये सकारात्मक असे निष्कर्ष समोर आले आहेत. ऑक्सफर्डच्या या लशीमुळे कोरोनाशी लढण्यासाठी एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. बऱ्याचदा कोणतं संशोधन झालं की जगातील ज्या काही विद्यापीठांचे नाव घेतले जाते त्यात ऑक्सफर्ड आघाडीवर असतं. कोरोना वॅक्सिनच्या शोधातही ऑक्सफर्डनं कमी वेळेत यश मिळवलं आहे. त्यामुळे सद्या ऑक्सफर्डची चर्चा होत आहे. जगातील अनेक दिग्गजांनी ऑक्सफर्डमध्ये शिक्षण घेतलं आहे. अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, नेते, शास्त्रज्ञ, संशोधक, खेळाडू यांनी ऑक्सफर्डमधून पदवी घेतली आणि त्यानंतर नावलौकीकही मिळवला. 

जगातील सर्वात जुनं असं हे ऑक्सफर्ड विद्यापीठ आहे. 2019 च्या क्युएस वर्ल्ड रँकिंगमध्ये ते पाचव्या क्रमांकावर होते. या विद्यापीठाच्या स्थापनेबाबत काही वाद आहेत. तरीही विद्यापीठात शिक्षण देण्यास एक हजार वर्षांपूर्वी इ.स. 1096 ला सुरुवात झाल्याचं म्हटलं जातं. पॅरीस विद्यापीठात इंग्लिश विद्यार्थ्यांना हेन्री दुसरा याने बंदी घातल्यानंतर ऑक्सफर्डमध्ये डेव्हलपमेंट झाली ते वर्ष होतं 1167. त्यानंतर विद्यापीठाची ख्यातीही वाढू लागली. एडवर्ड तिसरा याने ऑक्सफर्डच्या शिक्षण क्षेत्रातील अमुल्य योगदानाबद्दल कौतुकही केलं होतं. 

आणखी वाचा - कोरोना लस संशोधनात चिंपांझीची मदत; जाणून घ्या लस कशी काम करणार

ऑक्सफर्डचे विद्यार्थी आणि तिथल्या स्थानिकांमध्ये तेराव्या शतकात वाद झाले. त्यातूनच ऐतिहासिक अशा केम्ब्रिज विद्यापीठाची स्थापना झाली. ऑक्सफर्डची खास ओळख ही इंग्रजी आणि साहित्य यासाठी आहे. मात्र त्याशिवाय सध्या संशोधन क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या यशामुळे विद्यापीठाचं नाव जगभर चर्चेत असतं. विद्यापीठाचं ब्रीदवाक्य द लॉर्ड इज माय लाईट असं आहे. मानवी जीवनाच्या दृष्टीने ऑक्सफर्डनं 20 व्या आणि 21 व्या शतकात संशोधनाची व्याप्ती वाढवली. यामध्ये विज्ञान आणि औषधांच्या शोधात मोठी झेप घेतली. आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चेसाठी एक व्यासपीठ म्हणून विद्यापीठाने वेगळी ओळख तयार केली आहे. 

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड शहरात असलेल्या या विद्यापीठात 38 कॉलेज आहेत. तसंच चार प्रमुख विभाग आहेत. खाजगी विद्यापीठ असलं तरी ऑक्सफर्डला सरकारी निधीही मिळतो. विद्यापीठाचा कॅम्पस हा शहरातील वेगवेगळ्या भागात पसरला आहे. यामध्ये शैक्षणिक संशोधन विभाग, कॉलेज, होस्टेल इत्यादींचा समावेश आहे. विद्यापीठात ह्य़ुमॅनिटीज, मॅथेमॅटिकल फिजिकल अ‍ॅण्ड लाइफ सायन्सेस, मेडिकल सायन्सेस आणि सोशल सायन्सेस हे चार प्रमुख विभाग आहेत. ऑक्सफर्डमध्ये अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी सुविधा देण्यावर विद्यापीठाचा भर आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थीही विद्यापीठात शिक्षण घेतात. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती, फी, त्यांच्या राहण्याची आणि इतर सोयही केली जाते. त्यासाठी विद्यापीठाच्या काही अटी  आणि नियम आहेत. 

आणखी वाचा - ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीचे परिणाम उत्साहवर्धक

जगातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्वांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. यातील अनेकांनी जागतिक पातळीवर ठसा उमटवला आहे. महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन, स्टीफन हॉकिंग्ज हे संशोधक, ऑस्कर वाइल्ड, टीएस इलियट यांच्यासारखे साहित्यिक विद्यापीठाने जगाला दिले. इंग्लंडचे आतापर्यंत 27 पंतप्रधान ऑक्सफर्डचे माजी विद्यार्थी आहेत. भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हेसुद्धा ऑक्सफर्डचे माजी विद्यार्थी होते. विद्यापीठाच्या 60 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोबेल पटकावलं आहे.