महाराष्ट्रात क्वारंटाइन केलेले बिहारमधील IPS तिवारी आहेत कोण?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस तिवारी मुंबईत पोहचताच त्यांना बीएमसीने क्वारंटाइन केलं आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास गेल्या दीड महिन्यापासून सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसांना तपासात अद्याप ठोस माहिती न मिळाल्यानं सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबाने बिहारमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाची बिहार पोलिस तपासणी करत आहेत. या पथकाचे नेतृत्व युवा आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांच्याकडे आहे.

सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आयपीएस तिवारी मुंबईत पोहचताच त्यांना बीएमसीने क्वारंटाइन केलं आहे. त्यांना आयपीएस मेसऐवजी गेस्ट हाऊसमध्ये थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर सुशांतच्या तपास प्रकरणी दोन राज्यांच्या पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे क्वारंटाइन करण्यात आलेले आयपीएस अधिकारीही आता चर्चेत आले आहेत.

हे वाचा - आंतरराष्ट्रीय स्तरावर पोस्टिंग झालेल्या टीना डाबी ठरल्या पहिल्याच IAS

मूळचे उत्तर प्रदेशचे असलेल्या विनय तिवारी यांच्या उच्च शिक्षणासाठी वडिलांनी कर्ज काढलं. तेव्हा विनय यांनी वडिलांच्या या कष्टाचं चीज करण्याचं ठरवलं. युपीएससीच्या परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नातच त्यांना यश मिळालं. उत्तर प्रदेशातील ललितपूरमधून त्यांनी सुरुवातीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर विनय यांनी कोटा इथं क्लास जॉइन करून इंजिनिअरिंगची तयारी केली. गणित आणि विज्ञानात त्यांना रस होता. यामुळे अभ्यासातही मन लागलं.

IIT बीएचयूमधून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं पण युपीएससी करण्याची त्यांची इच्छा होती. त्याची तयारी करण्यासाठी दिल्ली गाठली. मात्र पहिल्या प्रयत्नात त्यांना अपयश आलं.पहिल्यांदा अपयश आल्यानंतर वडिलांनी आधार दिला. त्यानंर पुन्हा जोमाने प्रयत्न केले. दुसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं. यावेळी त्यांनी गणित विषय सोडून समाजशास्त्र, भूगोल आणि इतिहासाची निवड केली. 

हे वाचा - कोण आहेत नवं शैक्षणिक धोरण तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष के कस्तुरीरंगन?

इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर विनय तिवारी यांना नोकरी करायची होती. यासाठी शेवटच्या वर्षात त्यांनी इंटर्नशिपही केली होती. मात्र तेव्हाच वडिलांनी त्यांना युपीएससीसाठी प्रोत्साहन दिलं. विनय म्हणतात की, माझ्या यशासाठी मी नाही तर वडिलांनी संघर्ष केला. त्यासाठीच मी काहीतरी करून दाखवायचं ठरवलं आणि युपीएससी करण्याचा निर्णय घेतला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ips success story vinay tiwari from bihar who investigation of sushant singh rajput suicide