जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेची तारीख जाहीर; प्रवेशासाठी 75 टक्के गुणांची अट हटवली

टीम ई सकाळ
Thursday, 7 January 2021

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या तारखेची घोषणा केली.

नवी दिल्ली - केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी गुरुवारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या तारखेची घोषणा केली. 2021 च्या 3 जुलैला ही परीक्षा होणार आहे. तसंच आयआयटीमध्ये प्रवेशासाठी 75 टक्के गुण मिळणं बंधनकारक असल्याची अट काढून टाकण्यात आली आहे. यावर्षी परीक्षेचं आयोजन आयआयटी खडगपूर करणार आहे.

सरकारने जेईई मेन्स 2020 उत्तीर्ण झालेल्या पण कोरोनामुळे 2020 च्या जेईई अ‍ॅडव्हान्सला बसू शकले नव्हते अशा विद्यार्थ्यांना आता  थेट जेईई अ‍ॅडव्हान्स 2021 च्या परीक्षेला बसता येणरा नाही. त्यांना पुन्हा जेईई मेन्स 2021 देण्याची गरज नाही. त्यामुळे यंदा जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असेल. 

हे वाचा - वाटा करिअरच्या..: तयारी परदेशी शिक्षणासाठी...

जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेच्या माध्यमातून देशातील 23 आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. जेईई मेनमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा देण्याची संधी मिळते. 

गेल्या महिन्यात शिक्षणमंत्र्यांनी अशी घोषणा केली होती की, 2021 पासून जेईई मेन्स परीक्षा वर्षातून चार वेळा घेतली जाईल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात परीक्षेचे आयोजन करण्यात येईल. जेईई मेन्स परीक्षेचं पहिलं सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत आयोजित केलं जाईल. 

हे वाचा - करिअर ‘ती’चे: पाया मुलींच्या विकासाचा

याआधी शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी सीबीएसईच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या होत्या. बोर्डाच्या परीक्षा 4 मेपासून 10 जूनपर्यंत घेतल्या जाणार आहेत. तर निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर केले जातील असंही त्यांनी सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: JEE Advanced 2021 exam date anounce by education minister