Books
Bookssakal

लिबरल आर्ट्स : ज्ञानाभिमुख विद्याशाखा

गेली काही वर्षे विद्यार्थी व पालक आधुनिक काळाला सुसंगत असणाऱ्या विविध ज्ञानशाखांचे कौशल्य अवगत करण्याची संधी देणाऱ्या लिबरल आर्ट्‌स या विद्याशाखेकडे आकर्षित होताना दिसत आहेत.

- डॉ. प्रीती जोशी

गेली काही वर्षे विद्यार्थी व पालक आधुनिक काळाला सुसंगत असणाऱ्या विविध ज्ञानशाखांचे कौशल्य अवगत करण्याची संधी देणाऱ्या लिबरल आर्ट्‌स या विद्याशाखेकडे आकर्षित होताना दिसत आहेत. यामध्ये एक मुख्य विषय आणि त्याला पूरक असे इतर अनेक विषय असतात. त्यामुळे त्यातून कोणते विषय निवडायचे?

याचे पूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना असते आणि हेच या शाखेचे अनन्यसाधारण वेगळेपण आहे. या शाखेच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांच्या अभ्यासामुळे एकाच वेळी व्यापक, विस्तारित आणि सखोल ज्ञान मिळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व रोजगारक्षम कौशल्य विकासावरदेखील काम होते.

या क्षेत्रामुळे ह्यूमॅनिटीज, समाजशास्त्र यांबरोबरच मॅनेजमेंट, संगणकशास्त्र डेटा ॲनालेसिस, ॲडव्हरटायझिंग आणि ब्रॅडिंग, कम्युनिकेशन इत्यादी विभागांचे मार्ग विद्यार्थ्यांना खुले होतात. क्रिटिकल थिंकिंग, डिझाइन थिंकिंग, विश्लेषणात्मक कौशल्यांवर दिलेला भर, संशोधन, नवकल्पनांना असलेले महत्त्व या सर्व बाबींमुळे विद्यार्थी हे फक्त वर्गांच्या चार भिंतींमध्ये न शिकता आपल्या ज्ञानाचा परिघ नक्कीच वाढवू शकतात. थोडक्यात, लिबरल आर्ट्‌स हे एक बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम असलेले क्षेत्र असून, ते विद्यार्थ्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक विकासावरही भर देते.

निवडीचे स्वातंत्र्य

एक महत्त्वपूर्ण बाब म्हणजे, विद्यार्थी, पालकांना विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य हे क्षेत्र देऊ करते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, विद्यार्थ्याने मानसशास्त्र असा मुख्य विषय निवडला, तर या शाखेत तोच विद्यार्थी म्युझिक थेरपी, नृत्यथेरपी, योगा, समुपदेशन, भाषाशास्त्र, वर्तनशास्त्र अशा अनेक विद्याशाखांचा अभ्यास एकाच वेळी करू शकतो. विशेष म्हणजे, त्यातून सर्वांगीण विकासाची शैक्षणिक संकल्पना साकार होण्यासाठी अनुकूलता मिळते.

भारतीय ज्ञानपरंपरेतील ‘गुरुकुल शिक्षण पद्धती’ हा लिबरल आर्ट्‌स या शिक्षण पद्धतीचा मुख्य आधार आहे. पूर्वी गुरुकुलातील विद्यार्थ्यांना एकाच वेळी धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान, युद्धशास्त्र, प्रशासन, व्यापार अशा विविध ज्ञानशाखांचे अध्ययन करता येत असे. पाश्चिमात्य विकसित देशांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे एकूण क्रेडिट्सपैकी तब्बल ३३ क्रेडिट्स हे या शाखेतून आले पाहिजेत, असा कल पहायला मिळत आहे.

संधींची उपलब्धता

अभ्यासक्रमात अनुभवात्मक शिक्षणासाठी इंटर्नशिप हा महत्त्वाचा भाग आहे. इंडस्ट्री ओरिएंटेशन आणि प्रकल्पाधारित शिक्षण यांमुळे संधी उपलब्ध होण्यास मदत होते. डिजिटल साक्षरता आणि डेटा विश्लेषण यांसारख्या आधुनिक कौशल्यांचा समावेशही करण्यात आल्यामुळे याद्वारे एक वेगळा आयाम या शाखेला प्राप्त झाला आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय स्वीकृती असलेली ही शाखा आज भविष्यातील मोठ्या संधींची नांदी असून करिअरच्या दृष्टीने महत्वपूर्ण, भविष्यवेधी पाऊल आहे.

(लेखिका श्री बालाजी विद्यापीठ, पुणे या संस्थेच्या आर्ट्‌स, ह्यूमॅनिटीज आणि सोशल सायन्सेस विभागाच्या प्राचार्या आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com