'गुरु' असावा तर असा! निवृत्तीनंतर शिक्षकानं गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिले तब्बल 40 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher Vijay Kumar Chandsoria

भेटवस्तू मिळाल्यानंतर, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना ही प्रेरणा मिळाली असल्याचं ते सांगतात.

निवृत्तीनंतर शिक्षकानं गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दिले तब्बल 40 लाख

आज लोक स्वत:ची संपत्ती वाढवण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. परंतु, इतरांसाठी जगणारे अनेक लोक या जगात आजही कायम आहेत. माणुसकीचं असंच एक उदाहरण मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) पन्ना येथे पहायला मिळतंय. इथं एका शिक्षकानं (Government Teacher) निवृत्तीनंतर सुमारे 40 लाख रुपयांची रक्कम गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान केलीय.

पन्ना जिल्ह्यातील संकुल केंद्र रक्सेहा येथील प्राथमिक शाळा, खदिंयाचे सहाय्यक शिक्षक विजय कुमार चंदसोरिया (Teacher Vijay Kumar Chandsoria) हे नोकरीतून नुकतेच निवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त होताच, त्यांनी त्यांच्या GPF निधीतून मिळणारी सर्व रक्कम शालेय मुलांच्या शिक्षणासाठी आणि चांगल्या सुविधांसाठी देण्याचं जाहीर केलंय. या निधीतून त्यांनी आयुष्यात कधीही खर्च केला नाही, त्यामुळं ही रक्कम सुमारे चाळीस लाखांच्या आसपास मिळत असून, त्यांनी देणगी देण्याची घोषणा केलीय.

विशेष म्हणजे, त्यांच्या या निर्णयात त्यांचं संपूर्ण कुटुंब सामील आहे. चंदसोरियांच्या या निर्णयाचा सर्वांना अभिमानही आहे. शिक्षक विजय कुमार चंदसोरिया यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला आणि त्यांनी दूध विकून, रिक्षा चालवून शिक्षण पूर्ण केलं. 1983 मध्ये ते रक्सेहामध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त झाले. चंदसोरिया हे सुमारे 39 वर्षे गरीब मुलांमध्ये राहिले आणि नेहमी त्यांनी आपल्या पगारातून मुलांना भेटवस्तू आणि कपडे दिलेत. भेटवस्तू मिळाल्यानंतर, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यांना ही प्रेरणा मिळाली असल्याचं ते सांगतात.

चंदसोरिया म्हणाले, माझ्या मनात सुरुवातीपासूनच गरीब मुलांच्या चांगल्या आरोग्याची आणि शिक्षणाची भावना आहे. ही रक्कम सहकार्याच्या स्वरूपात प्रभावी ठरेल आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. याबाबत माझी पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी यांच्याशी सल्लामसलत करून मी ही रक्कम दिलीय. माझा मुलगा परमेश्वराच्या कृपेनं नोकरीला आहे आणि माझ्या मुलीचं लग्न झालंय, आम्ही कुटुंबीय सुखात आहोत, असंही ते सांगतात.