esakal | बारावीच्या निकालाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम!
sakal

बोलून बातमी शोधा

HSC_Students

बारावीच्या निकालाबाबत अद्यापही अनिश्चितता कायम!

sakal_logo
By
मिनाक्षी गुरव

पुणे : बारावीच्या निकालासाठी विद्यार्थ्यांची अंतर्गत मूल्यमापनातील गुणांची माहिती संकलित करण्याचं काम अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे अंतिम निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यानं निकालाच्या तारखेबाबत अनिश्चितता कायम आहे. (Maharashtra State board HSC result still uncertain aau85)

हेही वाचा: ...आणि बँका म्हणतात मी त्यांचे पैसे देणं लागतो - विजय मल्ल्या

राज्यात मागील आठवड्यात मुंबई, कोकण, कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस झाला. यावेळी पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे अंतर्गत मुल्यमापनाचे गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयापर्यंत पोचणे अशक्य झाले. यासह अनेक तांत्रिक अडचणींचाही सामना या कालावधीत करावा लागला. परिणामी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या मुदतीत महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे गुण संगणकीय प्रणालीत अपलोड करणे शक्य झाले नाही. त्यामुळे अजूनही विभागीय मंडळाकडे महाविद्यालयांकडून निकालाचे गुण अपलोड होण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बारावीच्या अंतिम निकाल तयार करण्यासाठी आणखी एक-दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे.

हेही वाचा: 'या' दिवसापासून अंथरुणास खिळलेल्या नागरिकांचे कोविड लसीकरण

दरम्यान, बारावीचा निकाल ३१ जुलैपूर्वी जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परंतु आपत्कालीन परिस्थितीत निकाल तयार करण्याच्या कामकाजाला अधिक कालावधी लागल्याने निकाल एक-दोन दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राज्य मंडळातर्फे दहावी, बारावीचा निकाल पाहण्याची एकच लिंक आतापर्यंत उपलब्ध करून देण्यात येत होती. त्यामुळेच यंदा दहावीच्या निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक बिघाडामुळे विद्यार्थ्यांना वेळेत निकाल पाहता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल पाहण्यासाठी एकापेक्षा अधिक लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

बारावीचा निकाल एकापेक्षा अधिक लिंकवर पाहता येणार

‘‘बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक लिंकवर बारावीचा निकाल पाहता येईल, याबाबत शिक्षण मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.

loading image
go to top