संवाद : सृजन पालकत्व

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्यातील वक्ते असं सांगत होते की, त्यांची नऊ वर्षांची मुलगी ते जे सांगतील, बोलतील त्याच्या उलट वागायची, बोलायची.
Creative parenting
Creative parentingsakal

- मंजिरी चौधरी

काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला. त्यातील वक्ते असं सांगत होते की, त्यांची नऊ वर्षांची मुलगी ते जे सांगतील, बोलतील त्याच्या उलट वागायची, बोलायची. त्यांनी तिला एक नियम ठरवून दिला. ती बारावी होईपर्यंत सगळे निर्णय बाबा घेणार.

मग १८ ते २५ पर्यंत निर्णय ती घेऊ शकते परंतु अंतिम निर्णय अर्थात, तिच्याशी चर्चा करून बाबाचाच. पंचविशीनंतर तिला जो निर्णय घ्यायचाय तो तिने घ्यायचा. अर्थात ‘स्वतःच्या’ जबाबदारीवर. हा नियम रोज एकदा तिला ते सांगतात कारण, तिच्या अंतर्मनात तो घट्ट बसावा. आत्तापर्यंतच्या तीन लेखांमध्ये आपण केलेल्या चर्चेच संपूर्ण सार व्हिडिओमध्ये मिळतं.

कारण बारावीपर्यंत आयुष्याकडे गांभीर्याने पाहण्याची दृष्टी नसते आणि वेळही नसतो. वेळ नसतो अशासाठी की, मित्रमैत्रिणी, अभ्यास, खेळ, मोबाइल गेम या सगळ्यात ती इतकी रममाण असतात की, करिअर, आयुष्याचा विचार या गोष्टी त्यांना बोअर वाटू शकतात. म्हणूनच, मी मागील लेखात म्हटल्याप्रमाणे, पालकांनी त्यांच्या करिअर निवडीकडे डोळसपणे लक्ष द्यायला हवं. जिथे त्यांचे निर्णय चुकत असतील तिथे त्यांचे मित्र होऊन, त्यांना योग्य मार्ग दाखवावा.

असं केलत तर अठराव्या वर्षी त्यांची निर्णयक्षमता व्यवस्थित विकसित होईल. अर्थात, १८ ते २५ हे त्यांचं वय स्वप्ने पाहण्याचं आहे हे विसरू नका. तुमच्या या सुरवंटाचे फुलपाखरू झालंय खरं; परंतु त्याच्या पंखात उडण्याचं अजून तितकं बळ आलेले नाही. ते तुम्ही त्याला द्यायला हवं म्हणजे असं की, निर्णयाचं स्वातंत्र्य त्याला द्यायचं परंतु त्या निर्णयाच्या चांगल्या, वाईट बाजूंचा विचार करून अंतिम निर्णय मात्र तुमचाच असला पाहिजे. इथेच तुमच्या अनुभवाचा कस लागणार आहे.

बोलताबोलता पाल्य पंचविशी गाठतो. ध्येयपूर्ती बऱ्यापैकी आवाक्यात येतं. आणि आत्ता पुढचे निर्णय! पुढे उच्च शिक्षण घ्यायचं की नोकरी? की नोकरी, शिक्षण दोन्हीही? नोकरी इथे की परदेशात. इथेच तुमची जागरूक पालकत्वाची मेहनत उपयोगी पडते. तुम्ही सतत त्याच्या आसपास राहून, केलेली मदत, वेळोवेळी दिलेले मैत्रीपूर्ण सल्ले, संस्कार या सगळ्यांमुळे तुमचा पाल्य एक परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा तरुण बनतो!

स्वतःचे निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर, घेऊ शकतो. तरीही त्याला २५ वर्षांच्या अनुभवावरून ही खात्री असतेच की काहीही प्रसंग आला तरी माझे आईवडील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. हाच तुमच्या सुजाण पालकत्वाचा विजय असतो.

(लेखिका विद्यार्थी-पालक संबंधांच्या अभ्यासक आहेत.)

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com