जास्तीत जास्त ‘रिव्हिजन’, कमीत कमी ‘रिसोर्स’

स्पर्धा परीक्षांचा महासागर तरून जाण्याचा मूलमंत्र म्हणजे ‘नंबर ऑफ रिव्हिजन्स’! तुम्ही जितक्या जास्त वेळा वाचाल, तितकं ते तुमच्या डोक्यात पक्कं होईल आणि चुकण्याची शक्यताही कमी होईल.
competitive exam
competitive examsakal

- योगेश पाटील, आयएएस - पश्‍चिम बंगाल

स्पर्धा परीक्षांचा महासागर तरून जाण्याचा मूलमंत्र म्हणजे ‘नंबर ऑफ रिव्हिजन्स’! तुम्ही जितक्या जास्त वेळा वाचाल, तितकं ते तुमच्या डोक्यात पक्कं होईल आणि चुकण्याची शक्यताही कमी होईल. दुसरं म्हणजे, यूपीएसबाबत असं म्हटलं जातं की, आभाळाखालचं सर्व काही म्हणजे अभ्यासक्रम आहे.

ते काही अंशी खरं असलं, तरी आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमाचा नीट अभ्यास करा. प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या पुस्तकांची यादी तयार करून तेवढीच पुस्तके मनापासून वाचा. तुमचे ‘सोर्सेस’ मर्यादित, पण ताकदीचे असू द्या. जितके जास्त स्रोत, तितका जास्त गोंधळ उडतो, हे लक्षात ठेवा.

परीक्षेत ऐच्छिक विषय निवडताना केवळ स्वतःची आवड काय असा विचार न करता, कोणत्या विषयात गुण जास्त मिळू शकतात, याचा विचार करा. तीन तासांत २० मोठे प्रश्‍न लिहायचे असल्याने भरपूर ‘टेस्ट सीरिज’ द्या. प्रत्येक सराव परीक्षा अंतिम परीक्षा आहे, असंच समजा. तेवढे १-२ वर्ष जे तुमच्या अभ्यासक्रमात नाही, ते तुमच्या जीवनात असता कामा नये, हे लक्षात ठेवा. त्यात सर्व सण, समारंभ वगैरे येतात. आपण १-२ वर्ष प्रामाणिकपणे मेहनत केली, तर यश नक्कीच मिळते.

मी मानववंशशास्त्र हा विषय ऐच्छिक म्हणून निवडला होता. त्यात मी पहिला आलो होतो. त्यात अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील? यासाठी मी भरपूर मेहनत घेतली. त्यामुळे केवळ आवड किंवा माझा मित्र/मैत्रीण अमुक विषय घेते आहे, म्हणून मी तो विषय घेतो, असे करू नका. सर्व बाजूंनी विचार करून मगच योग्य तो निर्णय घ्या.

अभ्यासाच्या काळात केवळ अभ्यासच करा. तुम्ही रोज किती तास अभ्यास करत होतात? हा प्रश्‍न मला चुकीचाच वाटतो. याचं कारण माझ्याबाबतीत तरी, मी जेव्हा अभ्यास करत नसायचो, तेव्हा अंघोळ, जेवण किंवा झोप एवढंच करत असायचो. फार तर पाय मोकळे करायला थोडं फिरायचो. बाकीचा वेळ मी वाचत किंवा अभ्यासच करत असायचो.

मला आयएएस का व्हावसं वाटलं? तर, त्यामागे एक महत्त्वाची घटना आहे. श्रीकर परदेशी हे तेव्हा नांदेडमध्ये जिल्हाधिकारी या पदावर रुजू झाले होते. त्यांनी नांदेडला दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त करण्यासाठी जे काही काम केलं, ते पाहून मी खूप प्रभावित झालो आणि तसं काही तरी करण्यासाठी प्रशासकीय सेवेत येण्याचा मी निर्णय घेतला.

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील शेळगाव गौरी या दोन-अडीच हजार लोकवस्तीच्या गावात माझं प्राथमिक शिक्षण झालं. माध्यमिक शिक्षणही त्याच भागात घेतलं. बारावीला नांदेड जिल्ह्यात दुसरा आलो. त्यानंतर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) मेकॅनिकल इंजिनीअरिंग पूर्ण केलं. त्यानंतर २०१७-१८ च्या दरम्यान दिल्लीला गेलो.

तेथे जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी केली. पहिल्याच प्रयत्नात आयपीएस झालो, पण आयएएस व्हायचं असल्याने आणखी अभ्यास केला आणि २०२० मध्ये आयएएस झालो. आता मी खडगपूरमध्ये उपविभागीय अधिकारी आहे. माझे वडील प्राथमिक शाळेत शिक्षक, तर आई गृहिणी आहे. मात्र, त्यांनी मला या प्रवासात जी साथ दिली, ती मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

महत्त्वपूर्ण टिप्स

  • विद्यार्थीमित्रांनो, नोट्स काढताना शक्य तो थोडक्यात, पण प्रभावीपणे गोष्टी टिपून ठेवा. नोट्स काढणे म्हणजे मूळ मुद्दा पुन्हा जसाच्या तसा लिहिणे नव्हे, हे ध्यानात ठेवा. त्यामुळे चार-पाच ओळींवरूनही पूर्ण मुद्दा लक्षात येईल अशा प्रकारे तुमच्या नोट्स असायला हव्यात.

  • स्वतःच्या नोट्स स्वतः तयार करा. प्रिंट आऊट किंवा झेरॉक्स कॉपी काढून नोट्स तयार करू नका. स्वतः नोट्स काढल्याने वाचन आणि लेखन दोन्ही होते. त्यामुळे तो विषय पक्का होण्यास मदत होते.

  • बहुपर्यायी परीक्षा पद्धतीमध्ये अचूक पर्याय निवडण्यासाठी नोट्स उपयुक्त ठरतात. त्यासाठी महत्त्वाच्या व्यक्तींची नावे, घटना, तारखा, कायद्यांची नावे, कलम इत्यादी गोष्टी अचूकपणे नोंदवून ठेवाव्यात.

  • स्वतःच्या नोट्स सतत ‘अपडेट’ करू नका. आवश्‍यक ते बदल आवर्जून करा, परंतु सतत बदल करत राहिल्याने गोंधळ उडतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com