esakal | Nagpur: बीएसस्सी, बी.कॉमचे प्रवेश फुल्ल
sakal

बोलून बातमी शोधा

admission

नागपूर : बीएसस्सी, बी.कॉमचे प्रवेश फुल्ल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षा रद्द केल्याने निकालात मोठी वाढ झाली. तसेच विद्यार्थ्यांचा सामान्य विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे जाण्याचा कल वाढत असल्याने अनेक महाविद्यालयांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्षाचे प्रवेश फुल्ल झाले आहेत.

बारावीच्या निकालात वाढ झाल्याने पारंपरिक अभ्यासक्रमांना सुगीचे दिवस आले. गेल्याकाही वर्षांपासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांसहीत बीसीसीए, बीसीए, बीबीए आदी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढलेला दिसून येत आहे. त्यानुसार गतवर्षी महाविद्यालयांमध्ये २० टक्के जागा वाढविण्यात आल्या होत्या. यावर्षी बारावीचा निकालात ८ टक्क्यांची मोठी वाढ झाली. याचा फायदा वाणिज्य आणि विज्ञान शाखेला झाला. गुणपत्रिका मिळताच विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये गर्दी वाढली. परिणामी शहर आणि ग्रामीण भागातील नामवंत महाविद्यालयातील वाणिज्य आणि विज्ञान शाखेसह इतर शाखेचे प्रवेश ‘फुल्ल’ झाले. गेल्यावर्षीही वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या जागा जवळपास पूर्णपणे भरल्या गेल्यात. अद्याप बऱ्याच विद्यार्थ्यांना बीकॉम आणि बीएसस्सी अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेले नाही. त्यामुळे प्रवेश मिळणार की नाही, या चिंतेत अनेक विद्यार्थी आहेत.

हेही वाचा: मलिक, प्रसारमाध्यमांविरुद्ध मुंबै बँकेचा हजार कोटींचा दावा

यावरून अनेक संघटनांनी महाविद्यालयांमध्ये प्रवेशाचा कोटा वाढविण्यासंदर्भात विनंतीही केली आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालये जागांमध्ये २० टक्के वाढवून देण्यासाठी प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी शेकडो विद्यार्थ्यांची भटकंती थांबविण्याासाठी जागांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे हे विशेष.

अनेकांचा स्वप्नभंग

बऱ्याच पालक व विद्यार्थ्यांना शहरातील नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असतो. मात्र, यंदा टक्केवारीत वाढ झाली असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नामवंत महाविद्यालयात प्रवेशाचे स्वप्न हुकले. मात्र, अद्यापही काही महाविद्यालयांमध्ये जागा असतानाही त्यात प्रवेशासाठी विद्यार्थीच इच्छुक नसल्याचे दिसून येते. याबाबत प्राचार्य फोरमद्वारे यापूर्वीच २० टक्के जागावाढ न करण्याची मागणी करण्यात आली आहे.

loading image
go to top