
NSE ला हवाय नवीन बॉस; पगार असेल करोडोंमध्ये
चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) आणि आनंद सुब्रमण्यम (Anand Subramanyam) यांच्यामुळे वादात अडकलेले नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) नव्या बॉसच्या शोधात आहे. NSE कडून MD आणि CEO पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. नवनियुक्त व्यक्ती सध्याचे एमडी आणि सीईओ विक्रम लिमये यांची जबाबदारी स्वीकारतील.
जुलैमध्ये संपत आहे मुदत -
विक्रम लिमये यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपत आहे. एनएसईने शुक्रवारी दिलेल्या माहितीत असे सांगण्यात आले की, इनिशियल पब्लिक ऑफरिंगचा (IPO) अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. दुसरीकडे NSE लिमये यांचा कार्यकाळ वाढवू शकते, अशीही शक्यता आहे.
हेही वाचा: Share Market Udates: युद्धाचा आठवा दिवस...शेअर बाजारात घसरण सुरुच
मिळेल कोटींचे पॅकेज-
चित्रा रामकृष्ण यांनी जुलै 2017 मध्ये NSE सोडल्यानंतर विक्रम लिमये यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विक्रम लिमये यांना त्यावेळी वार्षिक 8 कोटी रुपयांच्या पॅकेज देण्यात आले होते. त्यावेळी बीएसईचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान यांचं पॅकेज 3.26 कोटी होते तर चित्रा रामकृष्ण यांनी पद सोडले तेव्हा त्यांचे पॅकेज ७.८७ कोटी होते.
कधीपर्यंत अर्ज करता येईल-
या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मार्च आहे. लिमये यांना मुदतवाढ मिळण्यासाठी अन्य उमेदवारांशी स्पर्धा करावी लागणार आहे. लिमये हे NSE च्या री-ब्रँडिंगसाठी ओळखले जातात. अशा स्थितीत त्यालाही पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Share Market Updates: सकारात्मक सुरुवातीनंतरही शेअर बाजारात घसरण
पात्रता-
या पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराचा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा चांगला ट्रॅक रेकॉर्ड असणे आवश्यक आहे. याशिवाय जोखीम व्यवस्थापन आणि कंप्लायंस मैनेजमेंटमध्येही प्राविण्य आवश्यक आहे. IPO लाँच करण्याचा आणि व्यवस्थापन करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
Web Title: Nse Needs A New Boss Salary Will Be In Crores This One Feature Will Make A Point
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..