esakal | कोरोना संकट आणि ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

online education

कोरोना संकट आणि ऑनलाइन शिक्षण; विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

गेल्या दीड वर्षांपासून जगावर कोरोना महामारीचे संकट ओढावलं असून यामुळे अभूतपूर्व आणि असामान्य अशी परिस्थिती निर्माण झालीये. महामारीने आर्थिक पातळीवर मोठे परिणाम केलेत. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचे चक्र मंदावलंय. कोरोना महामारीने शैक्षणिक प्रक्रियेवरही अभूतपूर्व परिणाम केलं असल्याचं आपण पाहू शकतो. विषाणूच्या भीतीने शाळा-कॉलेज बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरीच बसून ऑनलाईन शिक्षण घेणे अनिवार्य झालं. ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना कितपत पचनी पडतंय हा प्रश्न वेगळा, पण अशा प्रकारच्या शिक्षणाशी जुळवून घेण्याचे प्रयत्न विद्यार्थी आणि शिक्षक करत असल्याचं दिसून येतंय.

कोरोना महामारीने शिक्षण प्रक्रियेला वेगळे वळण मिळालंय असं आपण म्हणून शकतो. शैक्षणिक संस्थांना आपल्या रचनेमध्ये अनेक बदल करावे लागणार आहेत. शाळा-कॉलेजमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसमोर शिकवणे आणि ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवणे यात फरक आहे. अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिकवणीमध्ये प्रश्न उपस्थित करणे टाळतात असा अनुभव आहे. शिवाय शिक्षक वर्गात जसे मार्गदर्शन करू शकतात तसंच आणि तितक्या प्रभावीपणे ऑनलाइन क्लासमध्ये शक्य आहे का असा प्रश्न पडतो. ऑनलाईन शिक्षण पद्धती ही विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांसाठी नवीन आहे. त्यामुळे यासाठी या दोघांना आणखी वेळ देणे आवश्यक आहे. येत्या काळात ही पद्धती सर्वांच्या अंगवळणी पडेल अशी आशा आहे.

हेही वाचा: UGCच्या विद्यापीठांना सूचना, 30 सप्टेंबरपर्यंत प्रथम वर्षाचे अ‍ॅडमिशन करा

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी अनेक वर्गाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाद्वारे पास करण्यात आलं आहे. करोनामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षेची सवय झालीये. घरी राहूनच करिअरसाठीचे पर्याय आता ऑनलाईनच शोधावे लागत आहेत. कोरोना संसर्गच्या भीतीमुळे परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय अपवाद म्हणून घेण्यात आला आहे. तरी येत्या काळात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाला पसंती देण्याची शक्यता आहे.

बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसमोर भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करावं असा प्रश्न उभा राहतो. इंजिनिअरिंग, कला, सामाजिक शास्त्र, मीडिया, मास कम्युनिकेशन, नर्सिंग, डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट, सेवा आणि पर्यटन, वाणिज्य, कायदा असे अनेक क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी खुले आहेत. पण, विद्यार्थी क्षेत्र निवडण्यामध्ये कायम गोंधळलेले दिसून येतात. त्यामुळे या वळणावर त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देणे महत्त्वाचे ठरते. विद्यार्थ्यांच्या करिअरसंदर्भात सकाळ डिजिटलतर्फे एक उपक्रम राबवला जाणार असून याबाबतची सविस्तर माहिती लवकरच सकाळच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉम्सवर मिळेल.

loading image