
इयत्ता अकरावीचा प्रवेश अर्ज भरण्याचा ऑनलाइन सराव सुरू
पुणे - इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश नोंदणीच्या सरावाला (मॉक डेमो रजिस्ट्रेशन) सोमवारपासून सुरवात झाली आहे. सरावाच्या पहिल्याच दिवशी जवळपास साडे आठ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा अनुभव घेतला.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रांतील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रत्यक्ष ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० मे पासून सुरू होणार आहे. पण हा अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता यावा आणि प्रत्यक्ष अर्ज भरणे सुलभ व्हावे, यासाठी संचालनालयामार्फत ‘डेमो लॉगिन’ची सुविधा सोमवारपासून उपलब्ध करून दिली आहे. अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारपर्यंत (ता.२७) अर्ज भरण्याचा सराव करता येणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या सरावात पहिल्या दिवशी पुण्यातून एक हजार ६८९ विद्यार्थ्यांनी, तर मुंबईतून सहा हजार १३२ विद्यार्थ्यांनी ‘डेमो लॉगिन’केले. पुणे, मुंबई पाठोपाठ नागूपरमधून ३२०, नाशिकमधून २३६ आणि अमरावतीमधून- ५० विद्यार्थ्यांनी या अंतर्गत नोंदणी करत अर्ज भरण्याचा सराव केला.
दरम्यान, ‘मॉक डेमो’मध्ये भरलेली माहिती २८ मे रोजी नष्ट करण्यात येईल. त्यानंतर ३० मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नव्याने विद्यार्थी नोंदणी आणि लॉगिन करून अर्ज भरायचा आहे, असेही माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी विद्यार्थी-पालकांनी ‘https://11thadmission.org.in’ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही संचालनालयातर्फे करण्यात आले आहे.
Web Title: Online Practice Of Filling Class Xi Admission Form Started Education
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..