
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थांमध्ये आर्किटेक्चर कोर्स उपलब्ध आहे.
बारावीनंतर उपलब्ध व्यावसायिक अभ्यासक्रमांपैकी एक महत्त्वाचा अभ्यासक्रम म्हणजे आर्किटेक्चर. ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तम निरीक्षण शक्ती, शास्त्रीय दृष्टिकोन, उच्च दर्जाची त्रिमिती आकलनक्षमता आणि सृजनशीलता आहे ते विद्यार्थी या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतात. बारावी सायन्स शाखेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे विषय घेतलेले विद्यार्थीच या शाखेत प्रवेशासाठी पात्र असतात. याशिवाय दहावीनंतर तीन वर्षांचा डिप्लोमा इंजिनिअरिंग कोर्स किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण झालेले, तसेच या परीक्षेत गणित हा विषय असलेले विद्यार्थीही आर्किटेक्चर प्रवेशासाठी पात्र असतात.
आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी ‘नाटा’ नावाची परीक्षा देणे अनिवार्य आहे. ही परीक्षा वर्षांतून दोनदा घेतली जाते. विद्यार्थी त्यापैकी कोणत्याही एका परीक्षेला किंवा दोन्ही परीक्षांना बसू शकतो. दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जास्त गुण मिळवलेली परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाते.
- पंजाब नॅशनल बॅंकेत सफाई कामगार भरती ! अशिक्षित देखील करू शकतात अर्ज
यंदा ही परीक्षा १० एप्रिल आणि १२ जून या दोन दिवशी घेण्यात येणार आहे. १२ जूनच्या परीक्षेसाठी ३० मेपर्यंत अर्ज करता येतील. परीक्षा दोनशे मार्कांची आणि तीन तासांची असून, ती कॉम्प्युटरवर घेण्यात येईल. यंदाच्या परीक्षेत ड्रॉईंगचा पेपर असणार नाही. परीक्षा पुण्यासह महाराष्ट्रातील सर्व मोठ्या शहरांमध्ये घेतली जाईल. या परीक्षेत दोनशेपैकी किमान पंचाहत्तर गुण मिळवणारे विद्यार्थी आर्किटेक्चर प्रवेशासाठी पात्र असतील.
‘नाटा’ परीक्षेसंबंधी अधिक माहिती तसेच आधीचे पेपर्स यासाठी www.nata.in या संकेतस्थळाला भेट द्या. ‘नाटा’ परीक्षेतील गुण आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेतील गुण या दोन्हीच्या आधारे विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर कोर्सला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थ्यांना बारावी बोर्डाच्या परीक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आर्किटेक्चर प्रवेशासाठी मान्यताप्राप्त महाविद्यालयांची माहिती www.coa.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- Indian Air Force Jobs : दहावी पास आहात! भारतीय वायुसेनेत 1500 जागांची बंपर भरती
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) या संस्थांमध्ये आर्किटेक्चर कोर्स उपलब्ध आहे, मात्र या ठिकाणी प्रवेशासाठी ‘जेईई पेपर २’ ही परीक्षा देणे अनिवार्य आहे. आर्किटेक्चर पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय, सरकारी/निमसरकारी नोकरी या बरोबरच इंटिरिअर डिझायनिंग, लॅंडस्केप डिझायनिंग, टाऊन प्लॅनिंग, साइट मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, व्हॅल्युएशन अशा विविध क्षेत्रांत संधी उपलब्ध आहेत.
- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)