आरटीई प्रवेशाबाबत पालक निरूत्साही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission
आरटीई प्रवेशाबाबत पालक निरूत्साही

आरटीई प्रवेशाबाबत पालक निरूत्साही

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांपैकी रिक्त राहिलेल्या जागांवर गेल्या सहा दिवसांत प्रतीक्षा यादीतून केवळ चार हजार २८१ बालकांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. प्रत्यक्षात शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस राहिले असतानाही प्रवेश प्रक्रियेत होणारी दिरंगाई लक्षात घेता, पालक या प्रवेश प्रक्रियेबाबत काहीसे निरुत्साही असल्याचे दिसून येत आहे.

आरटीई अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पुणे जिल्हा वगळता संपूर्ण राज्यात सध्या या प्रवेश प्रक्रियेनुसार प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील नऊ हजार ८६ शाळांनी नोंदणी केली असून एक लाख एक हजार ९०६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्यातील ६२ हजार ९७७ विद्यार्थ्यांनी नियमित लॉटरी पद्धतीने पहिल्या टप्प्यात प्रवेश निश्चित केले आहेत. आता प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या १७ हजार ६३९ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. त्यातील चार हजार २८१ विद्यार्थ्यांचे प्रवेश आत्तापर्यंत निश्चित झाले आहेत. प्रतिक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी प्रवेशासाठी येत्या शुक्रवारपर्यंतची (ता.२७) मुदत देण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आणखी ‘प्रतीक्षा’

पुणे जिल्ह्यात ९५७ शाळांमधून १५ हजार १२६ प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या होत्या. यासाठी ६२ हजार ९६० अर्ज दाखल झाले होते. त्यातून लॉटरीद्वारे १४ हजार ९५८ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड झाली. परंतु प्रत्यक्षात त्यातील केवळ १० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. तर प्रतीक्षा यादी अंतर्गत किती विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे, याबाबत सविस्तर तपशील अद्याप उपलब्ध होऊ शकलेला नाही. तसेच, जिल्ह्यासाठी प्रतीक्षा यादीतील बालकांच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. दरम्यान, ही प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Web Title: Parents Are Discouraged About Rte Admission Education

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top