aklanshakti
aklanshaktisakal

इंद्रियांची आकलनशक्ती

एखादे क्षेत्र जीवनकार्य (करिअर) म्हणून निवडताना त्यासाठी आपली अभिक्षमता आहे ना? हे तपासावे लागते. अभिरुची व क्षमता या दोन्ही गोष्टी मिळून अभिक्षमता बनते. क्षमता म्हणजे कार्यकौशल्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती यांचा संगम होय. याबाबतची अधिक माहिती आपण मागील भागात घेतली.

वेध भविष्याचा

डॉ. मिलिंद नाईक ,प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी

एखादे क्षेत्र जीवनकार्य (करिअर) म्हणून निवडताना त्यासाठी आपली अभिक्षमता आहे ना? हे तपासावे लागते. अभिरुची व क्षमता या दोन्ही गोष्टी मिळून अभिक्षमता बनते. क्षमता म्हणजे कार्यकौशल्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती यांचा संगम होय. याबाबतची अधिक माहिती आपण मागील भागात घेतली.

आपल्याला परिसरातील गोष्टींचे ज्ञान होते ते आपल्याला असलेल्या पंचज्ञानेंद्रियांतून! श्रवण, स्पर्श, दृश्य, चव आणि वास यांचे ज्ञान आपल्याला कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक या इंद्रियांमधून होते. या क्षमतादेखील व्यक्तीसापेक्ष भिन्न असतात. काहींना अतिशय सूक्ष्म असा आवाज जाणवतो, तर काहींना कोणताही वास चटकन ओळखता येतो. काहींना रंग-विसंगती लगेच लक्षात येते, तर काहींना खाद्यपदार्थात काय बिघडले आहे? हे चटकन लक्षात येते. इंद्रियांची अचूक आकलनशक्ती वेगवेगळ्या कार्यक्षेत्रांत वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी पडते. संगीताच्या, नाट्याच्या, चित्रपटाच्या, जाहिरातींच्या क्षेत्रात श्रवणकौशल्य महत्त्वाचे असते. संगीत देणे अथवा संपादन करणे यासाठी कान चांगला हवा. नाट्यात अथवा चित्रपटात आवाजातील योग्य चढ-उतारही समजायला हवेत. शिल्पकला, वैद्यकीय चिकित्सा, यासाठी स्पर्शज्ञानाची आवश्यकता भासते. शिल्पकलेत योग्य तो दाब देऊन मूर्ती घडवता यायला हवी, तर हाताने चाचपडून कोणत्या अवयवाला सूज आली आहे हे वैद्याला स्पर्शावरून ओळखता यावे लागते.

चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला, अभियांत्रिकी विशेषतः यांत्रिक व स्थापत्य अभियांत्रिकी यासाठी दृश्य गोष्टींचे चांगले आकलन हवे. हुबेहूब दृश्य अथवा रेखाचित्र कागदावर आणण्याआधी चांगले निरीक्षण हवे. पाककलेसाठी, खाद्यपदार्थाच्या गुण पडताळणीसाठी जीभ चांगली हवी. जिभेतील रुचिकलिका गोड, कडू, आंबट, खारट अशा चवी ओळखू शकतात. चहानिर्मिती कारखान्यात चवीचे ज्ञान असणाऱ्यांना मोठी मागणी आहे. सुगंधी पदार्थ व अत्तरे निर्माण करणारे कारखाने, औषध निर्माण कारखाने आदी ठिकाणी संवेदनशील घ्राणेंद्रिय असणाऱ्यांची गरज असते. अत्तरासाठी फुलांचा अर्क योग्य प्रमाणात उतरला आहे की नाही, हे वास घेऊन शोधावे लागते. माणसात ३५०–४०० प्रकारच्या रेणूंचा गंध ओळखण्याची क्षमता असावी. सध्यातरी चव व वास ओळखणारी, मोजणारी यंत्रे उपलब्ध नाहीत. खरे तर दैनंदिन आयुष्य नीट जगण्यासाठी सर्वच इंद्रियांची गरज असते. त्याशिवाय जगणे मुश्किलच; पण विशेषत्वाने ज्या इंद्रियज्ञानाची ज्या क्षेत्रात प्राबल्याने आवश्यकता आहे त्यांचा उल्लेख वर केला आहे.

दैनंदिन जीवनात वेगवेगळे अनुभव घेत असताना अथवा शाळेत उपक्रम करत असताना तुम्ही कधी स्वतःकडे वळून बघितले आहे का? माझे कोणते इंद्रिय विशेषत्वाने चांगले आहे? मला इतरांपेक्षा पटकन संगीतावरून गाणे ओळखता येते किंवा गायकाचा आवाज ओळखता येतो किंवा गाण्यातली चूक लक्षात येते? की चवीवरून एखाद्या पदार्थातील घटकपदार्थ ओळखता येतात? माझे नाक इतके चांगले आहे का, की घरात शिरताच आईने कोणता पदार्थ केला आहे ते अचूक ओळखता येते? किंवा एखाद्याने कोणते अत्तर लावले आहे हे चटकन ओळखता येते? अर्थातच इतरांनी ओळखायच्या आत. असे अनेक प्रसंग घडत असतात की, ज्यात आपण अशी काही तरी ओळखण्याची गोष्ट चटकन करून जातो आणि आपले कौतुक होते.

आपली ज्ञानग्रहण करण्याची क्षमता या वेगवेगळ्या इंद्रियांवरच अवलंबून आहे आणि त्यातील बलस्थानांवरच कोणते जीवनकार्य निवडायचे? हे अवलंबून आहे. त्यामुळे अशी निरीक्षणे करायला व ती नोंदवून ठेवायला विसरू नका. अतिशय सूक्ष्म गोष्टींचे ज्ञान होणे आणि ते अचूक असणे अशा दोन मिती आहेत. पुढच्या पुढच्या भागात आपण जेव्हा वेगवेगळ्या क्षेत्राविषयी विचार करू, तेव्हा ही निरीक्षणे निश्चितच उपयोगी पडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com