
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जवळपास २५ विषयांशी संबंधित पोझिशन पेपर’ विकसित करण्यात येत आहेत.
नव्या धोरणानुसार अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू
पुणे - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर जवळपास २५ विषयांशी संबंधित पोझिशन पेपर’ विकसित करण्यात येत आहेत. राज्य स्तरावरून हे पेपर विकसित करण्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. यात शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, तज्ज्ञ, नागरिक यांना आपले अभिप्राय, मते, प्रतिसाद, सूचना नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांच्यामार्फत राष्ट्रीय व राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने कार्यवाही सुरु आहे. हा अभ्यासक्रम आराखडे तयार करण्यासाठी २५ विषयांशी संबंधित पोझिशन पेपर’ विकसित करण्यात येत आहेत.
देशातील सर्व राज्यांतील या प्रक्रियेमध्ये एक वाक्यता राहावी, यादृष्टीने राष्ट्रीय स्तरावरून २५ विषयांवरील पोझिशन पेपरसाठीचे स्वरूप निश्चित केले आहे. निश्चित केलेले पोझिशन पेपर आराखडे राज्यांना उपलब्ध करून दिले आहेत. त्यानुसार राज्य स्तरावरून हे पेपर विकसित करण्याची स्वतंत्र प्रक्रिया सुरू केल्याचे एससीईआरटीने जाहीर केले आहे.
यात शिक्षणाचे तत्वज्ञान, पूर्वप्राथमिक शिक्षण आणि पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्र, परीक्षा पद्धतीतील सुधारणा आणि समग्र प्रगती पुस्तक अशा २५ विषयांवर पोझिशन पेपर आहेत. या पेपरशी संबंधित प्रश्न पोर्टलवर दिले आहेत. या प्रश्नांना अनुसरून इच्छुकांना आपली मते ३० मे पर्यंत नोंदविता येणार आहेत. त्यासाठी ‘https://scertmaha.ac.in/positionpapers/’ या लिंकवर पोर्टलला भेट द्यावी, असे आवाहन एससीईआरटीने केले आहे.
Web Title: Process Of Preparing Curriculum According New Policy Is Underway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..