करिअरच्या वाटेवर : कृषी अभियांत्रिकीतील रोजगार

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत मूलभूत व प्रभावी घटक ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची गरज वाढणे स्वाभाविक आहे.
agriculture engineering employment
agriculture engineering employmentsakal
Summary

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत मूलभूत व प्रभावी घटक ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची गरज वाढणे स्वाभाविक आहे.

- राजेश ओहोळ

शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेतील अत्यंत मूलभूत व प्रभावी घटक ठरला आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार अन्नधान्याची गरज वाढणे स्वाभाविक आहे. परिणामी, पर्यावरण सुरक्षा व अन्न सुरक्षा या दोन गोष्टींकडे अतिशय गांभीर्याने लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी शास्त्र-तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रात होणे ही गरज आहे.

कृषी शास्त्र व कृषी अभियांत्रिकीचा एकत्रित वापर करून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची बाधा न होता नैसर्गिक साधनसामग्रीचा पुरेपूर फायदा उठविणे, ही आजच्या कृषी संशोधनाची मुख्य संकल्पना बनली आहे. यामध्ये कृषी अभियांत्रिकी ज्ञानाच्या जोरावर चिरंतन कृषी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यात येते. पाणी, माती व पीक यांचे अभियांत्रिकीतील तत्त्वांच्या मदतीने नियोजन व व्यवस्थापन राखण्यात येते. कमीत कमी तोटा गृहित धरून कृषी क्षेत्राचे यांत्रिकीकरण, कृषी उत्पादनाचे व संबंधित अन्नधान्य, फळे, भाजीपाला, फुले इत्यादी पदार्थांचे संवर्धन, तसेच योग्य त्या ‘फूड प्रोसेसिंग’सारख्या वाढीव फायदेशीर पर्यायांची रचना करणे, कृषी व ग्रामीण जीवनाला आवश्‍यक ठरणाऱ्या ऊर्जेचे व्यवस्थापन आदी प्रमुख कार्ये कृषी अभियांत्रिकीच्या मदतीने केली जातात.

उपग्रहाद्वारे मिळणारी हवामान व इतर कृषीसंबंधित माहिती संकलित करून तिचा शेतकऱ्यांपर्यंत पुरवठा करण्यात माहिती-तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून भारतीय कृषी विद्यापीठांनी कृषी अभियांत्रिकी या शाखेला विशेष महत्त्व दिले आहे. कृषी संशोधन व विकास कार्यात देशातील अनेक नामवंत केंद्र व राज्य सरकारी संस्था कार्यरत आहेत. यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) या केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अखत्यारीत मोडणाऱ्या संस्थेचे स्थान अग्रगण्य समजले जाते. येथे कृषी अभियंत्यांना ‘रिसर्च फेलो’पासून ते ‘सायंटिस्ट’ पदापर्यंतच्या नोकऱ्या अखिल भारतीय स्तरावर मिळतात. संकेतस्थळ - www.icar.org.com

कृषी संशोधन सेवा (एआरएस)

कृषी शास्त्रज्ञ भरती बोर्डमार्फत दरवर्षी कृषी संशोधन सेवा परीक्षा अखिल भारतीय स्तरावर घेण्यात येते. या स्वतंत्र स्पर्धा परीक्षेमार्फत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांमध्ये ‘शास्त्रज्ञ’ या पदावर नेमणूक होते. कृषी संशोधन सेवा परीक्षा ही देशातील कृषी शिक्षणातील सर्वोच्च परीक्षा समजण्यात येते. हुशार, मेहनती व संशोधन वृत्तीच्या उमेदवारांना राष्ट्रीय कृषी संशोधनात या मार्गाद्वारे थेट प्रवेश करता येतो.

शैक्षणिक पात्रता - कृषीतील पदव्युत्तर (एम.एस्सी.) शिक्षण.

वयोमर्यादा - किमान २१ वर्षे व ३२ वर्षांपेक्षा कमी. अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांना अनुक्रमे ५ व ३ वर्षे सवलत मिळते.

कृषी आणि तत्सम शास्त्र विषयातील पदवी शिक्षण प्रवेश व राष्ट्रीय प्रज्ञा शिष्यवृत्ती परीक्षा ः भारतीय कृषी संशोधन परिषद दरवर्षी ही प्रवेश परीक्षा घेते. देशभरातील ५६ कृषी विद्यापीठांतील १५ टक्के पदवी शिक्षणातील जागा या परीक्षेमार्फत भरल्या जातात. निवडलेल्या उमेदवारांना पदवी शिक्षणाबरोबर दरमहा ठराविक रकमेची शिष्यवृत्ती मिळते.

शैक्षणिक पात्रता - बारावी शास्त्र परीक्षा ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. अनुसूचित जाती/जमाती व इतर मागासवर्गीय उमेदवारांना ४० टक्के गुणांची अट. बारावी शास्त्र परीक्षेस बसलेले उमेदवारही या परीक्षेस पात्र आहेत.

नोकरी कोठे मिळते? - सीएसआयआर, डीआरडीओ आणि अणुऊर्जा विभाग यांच्या स्वतंत्र संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमध्ये कृषी अभियंत्यांना आव्हानात्मक संशोधन कार्यात सामील होता येते. त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्रे, राज्य कृषी विद्यापीठे, महाविद्यालये यामध्ये शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून नोकरी मिळविता येते. वरील सरकारी नोकऱ्यांव्यतिरिक्त बहुराष्ट्रीय कृषी कंपन्या, खासगी कृषी उद्योग/प्रकल्प यामध्ये कृषी अभियंत्यांना करिअर करता येते.

स्वयंरोजगार - कृषी क्षेत्रात स्वयंरोजगाराच्या संधीही विपुल आहेत. कल्पकता व कृषी तंत्रज्ञानाच्या आधारे कृषी उत्पादन, अन्नधान्य प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात इत्यादी व्यवसायांमध्ये कृषी अभियंते स्वतःचे वेगळेपण दाखवून यशस्वी होऊ शकतात. नावीन्यपूर्ण विशेषतः असणाऱ्या बहुपयोगी कृषी अवजारे, उपकरणे, गरजेनुसार रचना केलेली यंत्रे यांचे उत्पादन हा पर्यायही सदैव खुला आहे.

रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने कृषी अभियांत्रिकी अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत विशेष वाटतो. कृषी क्षेत्रातील व्यावसायिकता वाढविण्याकरिता ‘कृषी अभियंत्यां’ची आवश्‍यकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com