‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ यशाचे रहस्य

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील ललगुण हे माझं छोटसं गाव. दहावीपर्यंतचं शिक्षण याच गावात झाल्यावर खटावला मी विज्ञान शाखेतून बारावी झालो.
nasir maner, IRS Deputy Commissioner of Revenue Thane
nasir maner, IRS Deputy Commissioner of Revenue Thanesakal

- नासिर मणेर, आयआरएस, महसूल उपायुक्त - ठाणे

सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील ललगुण हे माझं छोटसं गाव. दहावीपर्यंतचं शिक्षण याच गावात झाल्यावर खटावला मी विज्ञान शाखेतून बारावी झालो. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या वारणानगर येथून तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगमधून मी बीई-मेकॅनिकल ही पदवी प्राप्त केली. वडील बँकेत मॅनेजर होते, तर आई गृहिणी असून, ती बांगड्यांचा व्यवसायही करते. आमची आर्थिक परिस्थिती ठीक होती.

मात्र, आपल्या समाजासमोरच्या प्रश्‍नांनी मी अस्वस्थ होत असे. प्रशासनात आपण जाऊ शकलो, तर असे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण प्रत्यक्ष काम करू शकतो, ही जाणीव मला झाली. शिक्षणाच्या निमित्ताने विविध ठिकाणी फिरताना समाजातली दरी दिसली. ही दरी दूर करायची असेल, तर अधिकार प्राप्त करून घ्यावे लागतील, असं मला वाटलं आणि मी स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागलो.

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतून मी मार्गदर्शन घेतलं. त्यानंतर काही काळ दिल्लीलाही तयारी केली. ग्रामीण भागातून आल्याने माझ्यासमोर अनेक अडचणी होत्या. त्यात इंग्रजीसह अनेक प्रश्‍न होते. मात्र, मी त्यावर मात करत गेलो. दोन वेळा मला अपयश आलं. तिसऱ्या वेळी मात्र मी यशस्वी झालो. मी आयआरएस म्हणजेच भारतीय महसूल सेवेत कार्यरत आहे. २०१७ ला मी आयआरएस झालो. सध्या मी मुंबईत बांद्रा व ठाणे भागात महसूल उपायुक्त आहे. यापूर्वी मी गुवाहाटी येथेही काम केले आहे.

‘रिव्हर्स इंजिनिअरिंग’ ही माझ्या अभ्यासाची पद्धत होती. त्यामुळे मला अंतिमतः काय साध्य करायचं आहे? याचा विचार करून त्या टप्प्यापासून उतरत्या क्रमाने जे जे करावं लागतं, ते मी केलं. त्यामुळे माझं ध्येय साध्य झालं. माझी एक ‘पंचसूत्री’ आहे. मला असं वाटतं, की विद्यार्थ्यांनी त्या पंचसूत्रीचा अवलंब केला, तर ते निश्‍चित यशस्वी होऊ शकतील.

ती पंचसूत्री खालीलप्रमाणे -

१) मोठी स्वप्ने पाहा.

२) स्वप्नपूर्तीसाठी प्रत्यक्ष कृती करा.

३) अभ्यासाचा ताण घेऊन शारीरिक व मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

४) ‘स्मार्ट वर्क’ करण्यावर भर द्या. भारंभार किंवा अनावश्‍यक माहिती वाचू नका.

५) चिकाटी, जिद्द ठेवा. हरून आणि खचून जाऊ नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com