esakal | शाळांचे पहिले सत्र संपण्याच्या उंबरठ्यावर तरीही RTE चे प्रवेश सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

RTE admission process in maharashtra

RTE प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीची अंतिम मुदत 'या' तारखेपर्यंत

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे दीड वर्षापासून पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा कुलूपबंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळांचे पहिले सत्र संपण्याच्या उंबरठ्यावर असले तरी राज्यात आरटीईचे (RTE) प्रवेश सुरूच आहेत.

दाखले मिळण्यास उशीर होत असल्याने पेच

कोरोनाकाळात प्रवेशासाठी लागणारी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला आदी कागदपत्रे मिळण्यात होणारी दिरंगाई, कुर्मगतीने होणारी आरटीईची प्रवेशप्रक्रिया, शैक्षणिक वर्षाच्या आधीच खासगी शाळांचे होणारे विद्यार्थी प्रवेश आदी कारणांमुळे आरटीईच्या राज्यात तब्बल २७ हजाराहून अधिक जागा रिक्त असल्याचे चित्र आहे. आरटीई प्रवेशासाठी शुक्रवारी (ता. ८) तिसऱ्या फेरीची अंतिम मुदत आहे.

हेही वाचा: कोरोनाच्या नावाखाली होऊ द्या खर्च!

तिसऱ्या फेरीपर्यंत केवळ ७० टक्‍के प्रवेश

कोरोनामुळे प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला. यापूर्वी पडताळणी समितीकडे होणारे प्रवेश शाळास्तरावर पूर्ण करण्यात आल्याने पालकांची सोय झाली. प्रवेशावेळी पालक, विद्यार्थ्यांची होणारी गर्दी कमी झाली. यंदा आरटीई प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीपर्यंत केवळ ७० टक्‍के जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात शिक्षण विभागाकडून चौथी फेरीही काढली जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. दरवर्षी आरटीईचे प्रवेश लवकर सुरू केले जातील, असे आश्‍वासन शिक्षण विभागाकडून दिले जाते. मात्र, प्रवेशप्रक्रिया वेळेत सुरू होत नाही. यंदा प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ऑक्‍टोबर महिना उजाडला तरी प्रवेशासाठी पालकांची धावपळ सुरूच आहे. आगामी काळात शिक्षण विभागाने सूक्ष्म नियोजन करून जून महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील पालकांनी केली आहे.

ग्रामीण भागांत शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद

जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी एकूण ४५० शाळा असून, त्याअंतर्गत चार हजार ५४४ जागा आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी १३ हजार ३३० अर्ज आतापर्यंत आले असून, त्यापैकी चार हजार २०८ जणांना आरटीईअंतर्गत निवड झाली आहे. मात्र, त्यातील तीन हजार २०६ जणांनी आतापर्यंत आरटीईमधून प्रवेश पूर्ण केला आहे. ग्रामीण भागांत काही ठिकाणी मात्र शहराच्या तुलनेत कमी प्रतिसाद आहे.

आरटीई प्रवेशाची राज्यातील स्थिती

* एकूण शाळा : नऊ हजार ४३२

* एकूण प्रवेश क्षमता : ९६ हजार ६८४

* एकूण अर्ज संख्या : दोन लाख २२ हजार ५८४

* निवड झालेले : ९७ हजार ९५९

* एकूण प्रवेश पूर्ण : ६८ हजार ८४८

हेही वाचा: सात राज्यांतील 40 टक्के विद्यार्थ्यांकडे नाहीत डिजिटल डिव्हाईस!

''आरटीईअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून उत्तम दर्जाच्या मोफत शिक्षणाची संधी शासनाने उपलब्ध केली आहे. परंतु, प्रवेशप्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे पालकांना जून महिन्यात अन्य शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे रिक्त जागांचा फुगवटा वाढला आहे. आरटीईच्या जागांमध्ये सातत्याने होणारी घट संशोधनाचा विषय आहे. उर्वरित जागांसाठी शासनाने तातडीने चौथी फेरी राबवावी.'' - भरत कापडणीस, माजी तालुका संचालक, मविप्र नाशिक

loading image
go to top