‘डिजि’साक्षर : कृत्रिम बुद्धिमत्तेचे जाळे...!

शाळा, बॅंका, भारतीय आयुर्विमा महामंडळ, वीज मंडळ किंवा तत्सम ठिकाणी नोकरी करणाऱ्यांचे दुकानदार ठरलेले असायचे.
Artificial intelligence
Artificial intelligencesakal
Summary

शाळा, बॅंका, भारतीय आयुर्विमा महामंडळ, वीज मंडळ किंवा तत्सम ठिकाणी नोकरी करणाऱ्यांचे दुकानदार ठरलेले असायचे.

- समीर आठल्ये

शाळा, बॅंका, भारतीय आयुर्विमा महामंडळ, वीज मंडळ किंवा तत्सम ठिकाणी नोकरी करणाऱ्यांचे दुकानदार ठरलेले असायचे. कपडे, महिन्याच्या सामानापासून अगदी पाच दहा वर्षांतून एखाद्यावेळी होणारी टीव्ही, फ्रिजसारखी खरेदी लोक एकाच ठिकाणाहून करायचे. त्याचं मुख्य कारण या दुकानदारांना या लोकांचा साधारण पगार किती आहे, पगार कधी होतो, कर्ज मिळू शकते का? ऑफिसमधल्या इतर लोकांनी केलेली खरेदी अशा सगळ्या गोष्टी माहीत असत. त्यामुळे तो दुकानदार मालाची खरेदी रेंज मधलीच करत असे. माल उधार देताना त्याला फार चिंता वाटत नसे.

या दुकानदारांना फक्त त्या ऑफिसेसमध्ये काम करणाऱ्यांचीच आर्थिक बाजू माहीत असे असं नाही. कुणाला किती मुलं आहेत? त्यांची वयं काय आहेत? कुठल्या शाळेत जातात. बायको नोकरी करते का? अशी सर्व माहिती असे. ती माहिती वापरून तो दुकानदार त्याचा व्यवसाय करत असे. म्हणजेच आपण विकत घेऊ शकू असा माल दुकानात ठेवत असे.

आपला ठरलेला दुकानदार कशी आपली माहिती गोळा करून, आपल्या वागण्याचा अभ्यास करून व्यवसाय करत असतो किंवा करत असे. तसंच या ‘एआय’ सिस्टिम्स करत असतात. आपण ऑनलाइन शॉपिंग करतो तेव्हा आपण काय शोधतो, काय खरेदी करतो, किती, कधी, कुणासाठी खरेदी करतो. आपली बँक कोणती, आपण कुठे काम करतो हे सगळं रेकॉर्ड करतात आणि या माहितीची शहानिशा करून आपला शॉपिंगचा अनुभव चांगला करायचा प्रयत्न करतात.

‘एआय’ सिस्टिम्स इथेच थांबत नाहीत. त्या आपलं वागणं अभ्यासत राहतातच. त्यांच्याकडे एकाचवेळी अशी काही लाख रेकॉर्ड्स प्रोसेस करायची क्षमता असते. त्यामुळे दुकानदार कसा एकावेळी काहीशे लोकांचा फारतर विचार करू शकतो ते बंधन इथं नसते. एआय सिस्टिम मोठ्या प्रमाणावर डेटा प्रोसेस करून असे काही निर्णय घेऊ शकतात की ज्यामुळे त्या व्यवसायांचा आणि ग्राहकांचा दोघांचाही फायदा होतो.

याची काही उदाहरणं म्हणजे, आपण रोज वापरतो ती अॕप्स आहेत. अॕमेझॉन असो किंवा इतर कोणतेही सोशल मीडिया अॕप असो. ही अॕप्स मोठ्या प्रमाणावर ‘एआय’ सिस्टिम्स वापरतात. यांच्या कस्टमर केअरपासून इन्व्हेंटरीपर्यंत सगळीकडे ‘एआय’ सिस्टिम्स वापरल्या जातात. यामध्ये गोडाऊनमध्ये कुठली वस्तू कुठे ठेवली जावीपासून ग्राहकाने कुठला प्रश्न विचारला तर काय उत्तर दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी येतात.

फेसबुक, गूगलही मोठ्या प्रमाणावर ‘एआय’चा वापर करतात. आपल्याला दिसणारी ‘पीपल यू मे नो’ ची यादी त्याचाच परिणाम आहे. आपण फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया साइटवर काय वाचतो, युट्यूबवर काय बघतो याची नोंद या ‘एआय’ सिस्टिम्स घेत असतात आणि त्याप्रमाणे आपल्याला कंटेंट पुरवत असतात. फेसबुकवर आपण कुणाचे प्रोफाइल वारंवार बघत असू किंवा कुणाच्या पोस्ट, फोटो नेहमी लाइक करत असू तर फेसबुकला समजतं की त्या व्यक्तीबद्दल काहीही अपडेट असेल किंवा त्या व्यक्तीने काहीही नवीन पोस्ट केले तर आपल्याला दाखवलं पाहिजे.

आता ही सर्व निरीक्षणं आपल्या अपरोक्ष होत असतात. फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा युट्यूब यांचं उद्दिष्ट आहे, की आपण जास्तीत जास्त वेळ या प्लॅटफॉर्म्सवर घालवावा. आपण जास्तीत जास्त वेळ तेव्हाच या प्लॅटफॉर्म्सवर घालवू जेव्हा आपल्याला सतत आपल्या आवडीचं आणि इंटरेस्टिंग काहीतरी बघायला, वाचायला मिळेल.

त्यामुळे प्रत्येकाची आवड ओळखणे ही या प्लॅटफॉर्म्सची गरज आहे. त्यामुळे हे प्लॅटफॉर्म्स आपापली ‘एआय’ इंजिन्स अधिकाधिक मजबूत करायच्या मागे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com