‘डिजि’साक्षर : क्रांती दूरसंचारची...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Online
‘डिजि’साक्षर : क्रांती दूरसंचारची...!

‘डिजि’साक्षर : क्रांती दूरसंचारची...!

या लेखमालेत आपण आपला वर्तमान आणि भविष्य बदलणाऱ्या किंवा त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल अत्यंत सोप्या शब्दांत माहिती करून घेणार आहोत.

साताऱ्यात आमच्या घरी १९९५मध्ये लँडलाईन फोन आला. ‘बीएसएनएल’मध्ये काहीतरी आमूलाग्र बदल झाला होता आणि त्यामुळं कनेक्शन्स पटपट मिळायला लागली होती.

आमच्याकडं लँडलाईन फोन आला, त्याच वर्षी भारतात मोबाईल फोन सर्व्हिस सुरू झाली आणि बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी मोबाईल फोनवरून पहिला कॉल तत्कालीन दूरसंचार मंत्री सुखराम यांना केला. ‘हचिसन मॅक्स’ असं त्या मोबाईल सर्व्हिस कंपनीचं नाव होतं.

युग टेलिकॉम क्रांतीचे

मोबाईल फोनमुळं आपलं आयुष्य किती बदललं हे खरंतर मी सांगायची गरज नाही. टेलिकॉम क्रांतीमुळं जग जवळ आलं. मोबाईल फोन सर्व्हिस सुरू झाल्यापासून साधारणपणे दहा-बारा वर्षांत भारत जगातला सगळ्यात जास्त मोबाईल कनेक्शन्स असलेला देश झाला. घरी लँडलाईन आल्यापासून दोन वर्षांत, म्हणजे १९९७मध्ये मी पहिल्यांदा इंटरनेट वापरलं. माझा पहिला ईमेल आयडी तयार केला. हे सगळं मी साताऱ्यात राहून केलं. म्हणजे जिथे लँडलाईन मिळायला पाच वर्ष लागत होती त्या ठिकाणी १९९५नंतर लगेच इंटरनेटही आलं. इंटरनेट हे टेलिकॉम क्रांतीचं पहिलं अपत्य आणि ते झपाट्यानं मोठं झालं. इंटरनेटचा प्रसाराबरोबरच त्याचा स्पीडही वाढायला लागला. सुरुवातीला, म्हणजे ‘व्हीएसएनएल’नं १९९५मध्ये डायलअप इंटरनेट सर्व्हिस सुरू केल्यापासून पुढच्या दहा वर्षात निम्मा भारत ब्रॉडबॅन्ड इंटरनेट वापरायला लागला होता आणि आपल्याला वेगवान इंटरनेटची सवय लागायला लागली होती. हळूहळू आपल्याला ऑडिओ कॉल्सवरून व्हिडिओ कॉल्सवर जाण्याची कुणकूण लागली होती.

विश्‍व ॲण्ड्रॉइडचे

इंटरनेटच्या वाढत्या वेगाबरोबर आणि वापराबरोबरच त्यासाठी लागणारे मोबाईल हार्डवेअर, कॉम्प्युटर्स, वायफाय तंत्रज्ञान मोठ्या वेगानं बदलत होतं. ‘एचटीसी’ २००८मध्ये कंपनीनं भारतात पहिला ॲण्ड्रॉइड फोन बाजारात आणला आणि टेलिकम्युनिकेशनमधील दुसरी क्रांती सुरू झाली. ॲण्ड्रॉइड फोननं आपलं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. गरीब माणसापासून ते श्रीमंतांपर्यंत सगळ्यांकडे ॲण्ड्रॉइड फोन आला आणि त्यातूनच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या अॕप्सचा जन्म होण्यास सुरुवात झाली. इंटरनेट, मोबाईल तंत्रज्ञान ही जशी टेलिकॉम क्रांतीची अपत्ये आहेत तशी स्मार्ट फोन, ब्रॉडबॅन्ड ही इंटरनेट आणि मोबाईल तंत्रज्ञानाची अपत्ये आहेत आणि सोशल मीडिया, इ-कॉमर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, वेगवेगळी मोबाईल अॕप्स आणि नवीन आलेली क्रिप्टो करन्सी या त्यांच्या पुढच्या पिढ्या आहेत.

सामान्य माणूस, ग्राहक म्हणून आपल्याला जेवढी तांत्रिक माहिती गरजेची आहे आणि सहज समजू शकेल तेवढी देण्याचा प्रयत्न या लेखमालेद्वारे करणार आहे. वाचकांनो, तुम्हाला मोबाईल, इंटरनेट, स्मार्टफोन्स, नननवीन अॕप्स यांबद्दल अधिक जाणून घ्यायचं असल्यास तसा अभिप्राय द्यायला हरकत नाही.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top