वेध करिअरचा : डिझायनिंग करिअर ध्यास नावीन्याचा!

नावीन्याचा ध्यास असलेल्या मानवाला डिझाईनशिवाय प्रगती करता आली नसती. असे असूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये डिझाईन हा विषय दुर्लक्षितच राहिला.
career in designing
career in designingsakal
Summary

नावीन्याचा ध्यास असलेल्या मानवाला डिझाईनशिवाय प्रगती करता आली नसती. असे असूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये डिझाईन हा विषय दुर्लक्षितच राहिला.

- संतोष रासकर

डिझाईन ही संकल्पना मानवाच्या उत्क्रांतीच्या काळापासून अस्तित्वात आहे. किंबहुना मानवाकडे नवनिर्मितीची, सृजनशीलतेची क्षमता आहे, त्याच्या मुळाशी मानवाच्या विविध प्रकारच्या डिझाईन तयार करण्याची क्षमता आहे. अनेकदा डिझाईन म्हणजे सौंदर्य वाढविण्यासाठी केलेली कलाकृती असा समज आहे. मात्र, डिझाईन त्याच्या उपयोगिता विविध अर्थांनी ठरवत असते. म्हणूनच डिझाईनचा प्रभाव मानवी जीवनावर प्रचंड मोठा आहे.

नावीन्याचा ध्यास असलेल्या मानवाला डिझाईनशिवाय प्रगती करता आली नसती. असे असूनही भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये डिझाईन हा विषय दुर्लक्षितच राहिला. औद्योगिक प्रगतीचे उद्दिष्ट ठेवलेल्या धोरणामुळे आपण सामान्यपणे विज्ञान, तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग याच शिक्षणाला इतकी वर्षे महत्त्व देत आलो आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळात विपरीत होताना दिसेल त्यासाठी आत्ताच योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन भारत सरकार आपली भूमिका बजावत आहे आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग आणि कॉमिक टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला गेला. निर्णय घेऊन एक महिन्यात हा टास्कफोर्स कार्यान्वित करून त्यादृष्टीने वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.

बेरोजगारीच्या प्रश्‍नावरचे उत्तर

भारताला वेगवान प्रगती करत जगाचे आर्थिक केंद्र बनविण्यासाठी डिझाईन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकते, त्याचबरोबर बेरोजगारीच्या महत्त्वाच्या प्रश्नावर जर उत्तर हवे असेल तर ते आहे डिझाईन क्षेत्रातील करिअर. डिझाईन म्हणजे मेहंदी-रांगोळी-चित्रे हा सर्वसामान्य समज आहे. त्यातील नव्या प्रकारांविषयी अधिक माहिती सामान्य माणसाला नाही. खरे तर, औद्योगिक युगातच विविध प्रकारच्या डिझायनिंग क्षेत्राला महत्त्व प्राप्त झाले, तरी देखील कॉम्प्युटर युगात डिझाईन सर्वव्यापी बनले. डिझाईन म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसणारी सुंदर कलाकृती. कॉम्प्युटरने ती अधिक समृद्ध बनविली. जे डिझाईन पूर्वी आपल्या केवळ डोळे या एका ज्ञानेंद्रियासाठी होते, ते कॉम्प्युटर ने कान, नाक आणि त्वचा यांना सुद्धा अनुभव देणारे बनविले. कॉम्प्युटर युगातले डिझाईन अशा प्रकारच्या आभासी प्रतिमा निर्माण करण्यात यशस्वी झाल्याने आणि त्या आभासी प्रतिमांचा वापर ही प्रत्येक उद्योग क्षेत्राची गरज असल्याने कॉम्प्युटर डिजिटल डिझाईन क्षेत्राला मोठ्या प्रमाणात मागणी वाढू लागल्याचे चित्र दिसते आहे.

कला व तंत्रज्ञानाचा संगम

स्वाभाविकच डिझाईन जे कालपर्यंत केवळ कला या क्षेत्रात मोडत होते ते आता कलेसोबतचे तंत्रज्ञान बनले. कॉम्प्युटरमुळे विकसित झालेल्या तंत्र आणि इतर साधनामुळे डिझाईन कलात्मक तंत्रज्ञान बनले किंवा तांत्रिक कला बनली आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्राफिक्स, वेब, यूआय, यूएक्स, टू डी किंवा थ्री डी अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, ऑगुमेंटेड रिॲलिटी, व्हर्च्युअल रिॲलिटी या तांत्रिक विभागात या तंत्रज्ञानाची विभागणी करता येईल. कलात्मकता किंवा उपयोगीतेच्या आधारे याच्या विविध प्रकारच्या विभागणी आहेत. कलात्मक दृष्टीने किंवा उपयोगीतेच्या दृष्टीने याचे प्रकार उद्योगाच्या वाढत्या गरजेनुसार वाढतच जाणारे आहेत. असे असले तरी याचे मूळ तंत्रशास्त्र आणि कलात्मकता ही सर्वांची एकच आहे.

मनोरंजन आणि शिक्षण यांच्याबरोबर आरोग्य क्षेत्र, वाहन उद्योग, निर्मिती उद्योग, स्थापत्य-बांधकाम उद्योग अशा सर्वच क्षेत्रात नावीन्य, सृजनशीलता, सादरीकरण, प्रचार-प्रसार यासाठी डिझाईन वेगवेगळ्या रूपात वापरले जाते. एकट्या मनोरंजन क्षेत्रात अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट, गेमिंग कॉमिक याची वार्षिक उलाढाल ६ हजार कोटींच्या पुढे गेली आहे. शिक्षण क्षेत्रासाठी कोविडमुळे डिजिटायझेशनचे महत्त्व अधोरेखित झाल्याने ई-लर्निंग आणि डिजिटल शिक्षण यांचे उद्योग वाढत आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी मेडिकल अॅनिमेशन, स्थापत्य बांधकाम क्षेत्रात थ्री डी एलिव्हेशन, प्रॉडक्ट डिझाईन साठी टू डी इलुस्ट्रेशन किंवा थ्री डी मॉडेलिंग, आयटीसारख्या उद्योग क्षेत्रात यूआय-यूएक्स, अशा विविध गोष्टींचा यात करिअर करण्यासाठी पर्याय निर्माण होतात. एकूणच या क्षेत्राने ७४ पेक्षा जास्त नव्या करियरच्या संधी निर्माण केल्या आहेत.

करिअर म्हणून इथे नोकरी, व्यवसाय, फ्रिलान्सिंग आणि इनक्युबेशन यांसारखे पर्याय उपलब्ध होतात. आपल्याकडच्या 10+2+3+2 या शिक्षणाला इथे विचारात न घेता काम करण्याच्या क्षमतेवरच करिअर संधी उपलब्ध होतात. या क्षेत्राचा उद्योग म्हणून विचार केल्यास इथे केवळ डिझायनर अपेक्षित नसून प्रत्येक डिझायनर हा उत्तम तंत्रज्ञ, उत्तम समस्या निराकरण करणारा, उत्तम प्रशिक्षक, उत्तम लीडर देखील बनला पाहिजे. याकडे आपल्या शिक्षण अभ्यासक्रमात लक्ष दिले गेले पाहिजे.

जगात या क्षेत्रातल्या मनुष्यबळाची मागणी उद्योगाच्या वाढत्या गरजेमुळे वाढतच आहे, मात्र एकूणच सर्व गोष्टी विचारात घेतल्यास भारत या क्षेत्रातील जगाचे केंद्र बनू शकतो. यातून फार मोठ्या रोजगाराच्या संधींबरोबर आर्थिक विकासाची संधी निर्माण होणार आहे. या क्षेत्रात संशोधन पूरक कामाची गरज असून, डिझाईन केवळ कौशल्य म्हणून मर्यादित न राहता ते निर्मितीप्रधान झाले पाहिजे.

(लेखक सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे कार्यकारी संचालक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com