आता इंग्लिशला घाबरू नका; असं लढा बिनधास्त!

english
english

शालेय शिक्षणानंतर, विशेषतः मराठी माध्यमातील शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन शैक्षणिक काळात बौद्धिक क्षमता असूनही केवळ भाषिक कौशल्याचा अभाव, विशेषतः इंग्लिश भाषेच्या कौशल्याचा अभाव असल्यास एक प्रकारचा न्यूनगंड बळावण्याची शक्यता असते. याचे मुख्य कारण म्हणजे ज्या विषयात कळत नकळत आणि सहजपणे गुण मिळायचे त्या भाषेत बोलताना आपली बोबडी का वळते याचे उत्तर काही केल्या मिळत नाही. महाविद्यालयात शिक्षण घेताना, गटागटाने काम करत असताना, एखादा विशेष कार्यक्रमाचे नियोजन करत असताना आपण इतरांच्या तुलनेने कमी आहोत असे वाटत राहते.

कधी कधी बौद्धिक क्षमतेच्या जोरावर चांगले गुण मिळवून नोकरी मिळवताना हातातोंडाशी आलेली नोकरी केवळ मुलाखतीत इंग्लिशमध्ये उत्तरे देता न आल्यामुळे जाणे किंवा महत्प्रयासाने मिळालेल्या नोकरीत, कॉर्पोरेट ऑफिसमध्ये असलेल्या इंग्लिशमय वातावरणाशी जुळवून घेता न येणे, अशा प्रकारच्या अपयशाने येणारे नैराश्य येण्याची शक्यता असते.

शालेय शिक्षण मातृभाषेतून झाल्यास ते सहज, नैसर्गिकरीत्या होते, संकल्पना पटकन स्पष्ट होण्याची शक्यता वाढते, असे अनेक शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. फक्त त्या काळात तितकी समज नसल्याने किंवा पुढे या भाषेला इतके महत्त्व प्राप्त होणार आहे, हे लक्षात न आल्याने ताण येतो व तो वाढत राहतो.

1. भाषा आंतरजालाची, ज्ञानविज्ञानाची
या स्मार्ट युगात बऱ्याचदा आपण माहितीसाठी, ज्ञानासाठी आंतरजालाची (इंटरनेटची) मदत घेत असतो. तेथे उपलब्ध माहिती विविध भाषांत असते. इंग्लिश भाषेत असलेली माहिती इतर भाषेच्या माहितीच्या तुलनेत अधिक आहे, हे तुमच्या लक्षात आले असेलच. त्यामुळे या भाषेवर प्रभुत्व असलेल्यांना याचा फायदा इतरांच्या तुलनेत जास्त होतो.

2. भाषा राष्ट्राराष्ट्रांची
अनेक देशांची अधिकृत भाषा इंग्लिश आहे. ती जगामध्ये सर्वांत जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाची व संपर्काची ही भाषा आहे.

3. भाषा समाजमाध्यमांची आणि संपर्काची
विविध समाजमाध्यमांच्या मदतीने वैचारिक देवाणघेवाण होताना, विविध विषयांवर चर्चा होताना इंग्लिश भाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. वैमानिकांना आणि त्यांना संपर्क करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इंग्लिश भाषा यावीच लागते.  चला तर मग, सुरू करू या वैश्विक भाषेचा प्रवास!

4. भाषा व्यवसायाची, आणि कार्यालयांची
भारतातील अनेक राज्यांत, विशेषतः महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विविध क्षेत्रांत अग्रगण्य असलेल्या संस्थांची कार्यस्थळे आहेत. अशा ठिकाणी काम करणाऱ्या मराठी नोकरदारांना बऱ्याच वेळा परदेशी सहकाऱ्यांशी, प्रतिनिधींशी इंग्लिशमध्ये संवाद साधताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यालयात नोकरी देताना संबंधित अधिकारी नोकरी देतानाच इंग्लिशमधील संवाद कौशल्यावर जास्त भर देतात व त्याप्रमाणे कर्मचारी निवडताना दिसतात.
उच्च पदावर काम करणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी त्यांच्या इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवूनच तेथे पोचतात हे आपल्याला दिसून येते. नोकरीपेक्षा व्यापारात प्रगती करू पाहणाऱ्या व्यावसायिकांना इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवल्याचा अधिक फायदा होतो.

5. भाषा करमणुकीच्या साधनांची
आंतरराष्ट्रीय पातळीवर विचार केला तर इतर भाषांच्या तुलनेत इंग्लिश भाषेतील चित्रपट, माहितीपट,  पुस्तके, शोधनिबंध, ध्वनिफिती व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

(लेखक वीस वर्षांपासून अध्ययन क्षेत्रात कार्यरत असून, शिक्षकांना इंग्रजी शिक्षणाबाबत प्रशिक्षण देतात.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com