काय ऐकावे?

शैलेश बर्गे
Thursday, 23 January 2020

इंग्लिश भाषा वापरत असताना नक्की काय ऐकायचे ते आता पाहूया... इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आपण जास्तीत जास्त ऐकणार आहोत. We all know, GOOD LISTENERS BECOME GOOD SPEAKERS. 

इंग्रजी शिका : 
मागील लेखात आपण ऐकणे या कौशल्याविषयी चर्चा केली. ऐकण्याचे महत्त्व व फायदे आपण पाहिले. इंग्लिश भाषा वापरत असताना नक्की काय ऐकायचे ते आता पाहूया... इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी आपण जास्तीत जास्त ऐकणार आहोत. We all know, GOOD LISTENERS BECOME GOOD SPEAKERS. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Small strokes fall great oaks. Every big thing was once small. सर्व मोठ्या गोष्टींची सुरुवात बहुधा लहानच असते. आपणसुद्धा लहान लहान गोष्टींतून इंग्लिश शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत.

खालील काही गोष्टी करत करत आपण आपले श्रवणकौशल्य प्रभावी करणार आहोत.

ऐका व वारंवार वापरा : आपल्या दैनंदिन जीवनात बऱ्याचदा आपण काही वाक्यरचना वापरत असतो. त्याच्याऐवजी आपल्या वापरात नसलेल्या वाक्यरचना ऐकून त्या वारंवार वापरल्या पाहिजेत.  उदा. Open the window, please? ही वाक्यरचना आपण बऱ्याचदा वापरतो, पण Would you mind opening the window, please? हे वाक्य ऐकल्यावर ते पुन्हा वापरायला नक्कीच आवडेल ना? 

या व अशा वाक्यांचा ठरवून वापर करणे सहज शक्य आहे. यासाठी नवनवीन वाक्यरचना ऐका व जाणीवपूर्वक त्यांचा वापर करा. ती रचना अगदी पक्की होईपर्यंत!

ऑडिओ/व्हिडिओंचा वापर : इंग्लिश शिकणे यापूर्वी कधीच एवढे सोपे नव्हते, असे म्हटल्यावर अतिशयोक्ती वाटणे साहजिकच आहे. स्मार्टफोनच्या युगात ते खरेच सोपे झालेले आहे. youtube वर विविध प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते आपल्या भाषा समृद्धीसाठी कसे वापरता येतील ते आपण पाहू या. सुरुवातीला लहान लहान व्हिडिओ पाहावेत. (उदा. https://www.youtube.com/watch?v=UnAThOLNv7s, https://www.youtube.com/watch?v=NdXPnJLR07E)   पहिल्या वेळी पाहताना सबटायटल्स सुरू ठेवून व वाचत वाचत ऐकावे. दुसऱ्या वेळी काही समजले नाही, तरच सबटायटल्स वाचावेत, अन्यथा न वाचता व्हिडिओ पाहत ऐकत राहावे. तिसऱ्या वेळी स्क्रीनकडे न पाहता ऐकावे.

खेळातून शिक्षण : आपल्या देशात विविध प्रकारचे खेळ खेळले जातात. क्रिकेट हा खेळ इतर खेळांच्या तुलनेने मोठ्या प्रमाणावर खेळला व पाहिला जातो. या व यांसारख्या खेळांचे इंग्लिशमधील धावते समालोचन ऐकणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे आपल्या आवडीचा खेळ पाहताना वेळ दवडल्याची खंतदेखील वाटणार नाही. विविध खेळांत वापरल्या जाणाऱ्या शब्दांची, वाक्यरचनांची भर पडत राहील. 

बातम्या : टीव्हीवर विविध प्रकारच्या वाहिन्या उपलब्ध आहेत. त्यापैकी काही वाहिन्या फक्त बातम्या प्रसारित करतात. त्यातसुद्धा काही वाहिन्या फक्त इंग्लिशमधून वार्तांकन करतात. या बातम्या काळजीपूर्वक ऐकल्यास दुहेरी फायदा होतो; एक म्हणजे चालू घडामोडी समजतात आणि दुसरी म्हणजे, उत्तम इंग्लिश ऐकायला मिळते. यात आणखी एक गोष्ट करता येऊ शकते, ती म्हणजे आंतरराष्ट्रीय वाहिन्या, उदा. CNN, BBC सारख्या वाहिन्यांवर बातम्या पाहून प्रमाणित उच्चारण (AUTHENTIC ACCENT) ऐकता येऊ शकते. 

स्मार्ट फोन : आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलेल्या त्या भ्रमणध्वनीला स्मार्ट फोन हे अगदी सार्थ नाव मिळाले आहे. यात अमुक एक गोष्ट करता येत नाही, अशा फार कमी गोष्टी शिल्लक राहिल्या आहेत. आपण स्मार्ट फोनचा वापर इंग्लिश भाषा विकसनामध्ये करून घेऊ शकतो. यामध्ये विविध प्रकारचे शब्दकोश उपलब्ध करून घेता येतात. या शब्दकोशांच्या वापरातून नवीन शब्दांचे उच्चार पुनःपुन्हा ऐकता येतात. विविध ॲपलिकेशन्स उदा. STORY TELLING APP, BRITISH COUNCIL PODCASTS, AUDIO BOOKS, यांसारख्या विविध ॲप्लिकेशन्सचा वापर करून श्रवणकौशल्य विकसित करू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shailesh Barge article learn English