esakal | स्टेट बॅंक भरणार क्‍लर्कची पाच हजारांवर पदे ! अर्ज प्रक्रिया झाली सुरू; जाणून घ्या सविस्तर

बोलून बातमी शोधा

SBI
स्टेट बॅंक भरणार क्‍लर्कची पाच हजारांवर पदे ! अर्ज प्रक्रिया झाली सुरू; जाणून घ्या सविस्तर
sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : कोरोना महामारीच्या नकारात्मक काळातही काही सकारात्मक बातम्या येत आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वांत मोठी असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) देशभरातील शाखांमधील क्‍लर्क संवर्गातील ज्युनिअर असोसिएट्‌स (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) च्या 5000 + पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. सोमवारी, 26 एप्रिल 2021 रोजी बॅंकेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांकडून रेग्युलर आणि बॅकलॉगसह पाच हजारांहून अधिक क्‍लर्क संवर्गाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

एसबीआय क्‍लर्क भरती 2021 ऑनलाइन अर्ज

इच्छुक उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. एसबीआय क्‍लर्क भरती 2021 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया मंगळवारी, 27 एप्रिल 2021 पासून सुरू झाली आणि उमेदवार 17 मे 2021 पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतील. तथापि, उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे, की त्यांना एसबीआयने निश्‍चित केलेली 750 रुपये अर्ज फी केवळ 17 मे पर्यंत भरावी लागेल. त्याच वेळी उमेदवार 1 जून 2021 पर्यंत भरलेल्या एसबीआय लिपिक भरती 2021 च्या अर्जाचा प्रिंटआउट घेऊ शकतील आणि सॉफ्ट कॉपी देखील डाउनलोड करू शकतील.

हेही वाचा: ATMA 2021 मे सेशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू ! "ही' आहे शेवटची तारीख

कोण अर्ज करू शकेल?

ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थांकडून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण केली आहे, ते एसबीआय क्‍लर्क भरती 2021 मध्ये अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे किंवा सेमिस्टरचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात; परंतु या उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2021 पर्यंत त्यांच्या पदवी प्रमाणपत्राची प्रत सादर करणे आवश्‍यक आहे.

याव्यतिरिक्त 1 एप्रिल 2021 रोजी उमेदवाराचे वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, वयोमर्यादेमध्ये अनुसूचित जाती / जमाती, ओबीसी, पीडब्ल्यूडी, माजी सैनिक, विधवा / घटस्फोटित महिला उमेदवारांनाही सरकारने ठरविलेल्या नियमांनुसार सवलत देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी एसबीआय क्‍लर्क भरती 2021 अधिसूचना पाहा.

अशी असेल निवड प्रक्रिया

स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये क्‍लर्क संवर्गातील ज्युनिअर असोसिएट्‌स (कस्टमर सपोर्ट आणि सेल्स) या पदासाठी उमेदवारांच्या निवडीसाठी विहित निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन प्रारंभिक परीक्षा, ऑनलाइन मुख्य परीक्षा आणि उमेदवारांनी निवडलेल्या स्थानिक भाषा परीक्षेच्या टप्प्यांचा समावेश आहे. प्राथमिक परीक्षा इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता आणि तर्कसंगततेशी संबंधित एकूण 100 प्रश्नांसह 1 तासाची असेल. प्राथमिक परीक्षेसाठी 100 गुण निर्धारित असतील. प्राथमिक परीक्षेत 0.25 गुणांचं निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. प्राथमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी बोलावले जाईल.