‘लक्ष्य’भेद : वैचारिक स्पष्टता

प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेताना योग्य पद्धतीनं विचार करणंही आवश्यक आहे. वैचारिक स्पष्टता हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अनेक टप्प्यांवर महत्त्वाचा ठरणारा असा गुण आहे.
conceptual clarity
conceptual claritysakal
Summary

प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेताना योग्य पद्धतीनं विचार करणंही आवश्यक आहे. वैचारिक स्पष्टता हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अनेक टप्प्यांवर महत्त्वाचा ठरणारा असा गुण आहे.

- सोनल सोनकवडे

प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेताना योग्य पद्धतीनं विचार करणंही आवश्यक आहे. वैचारिक स्पष्टता हा स्पर्धा परीक्षांच्या तयारीत अनेक टप्प्यांवर महत्त्वाचा ठरणारा असा गुण आहे. विचारांची स्पष्टता हा काही जणांच्या स्वभावाचा भाग असतो तर काही जणांना ती रोजच्या अनुभवातून येते. आपल्या कोणत्याही कृतीमागे काही कारण असते, कारण त्याला एक तर्कशास्त्र असते. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणतीही गोष्ट करताना आपण त्यामागच्या चांगल्या व वाईट गोष्टी पाहणे अपेक्षित असते. आपण त्या पाहतोही. त्याच प्रकारे स्पर्धा परीक्षा देण्याचं तुमचं काही तरी ठोस कारण असलं पाहिजे.

तुमच्या प्रयत्नांची सुरुवात ही त्या क्षेत्राबद्दलच्या स्पष्ट विचारांनीच झाली पाहिजे. तुमचे कारण मग ते काहीही असो, तुम्हाला ते पक्के ठाऊक असले पाहिजे. विचारांच्या स्पष्टतेचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे तुम्ही एके ठिकाणी अडकून पडत नाही. तुम्ही प्रवासाची दिशा आणि त्यातील खाच खळगे यांची जाणीव ठेवून प्रवास सुरू केलात तर तुमचा प्रवास सोपा होतो. हे प्रत्यक्ष आणि प्रतिकात्मक प्रवासाच्या बाबतही तितक्याच अंशी खरं आहे.

याचाच अर्थ असा की, कृती आणि विचारांची स्पष्टता यांचा जवळचा संबंध आहे. विचारांतील स्पष्टतेमुळे कृतीला दिशा मिळते. विचार स्पष्ट नसतील तर काम करत असताना गोंधळ उडतो, काम पूर्ण करायचा आळस येतो आणि महत्त्वाचं म्हणजे काम करण्याची गती मंदावते. थोडक्यात मी ध्येय निश्चिती या प्रकरणात म्हटलं तसं विचारातील स्पष्टता आणि ध्येय निश्चिती यांचा जवळचा संबंध आहे. मानवी मेंदू सतत या ना त्या गोष्टींचे हिशोब घालत असतो.

त्याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे आपण एखादी नवी गोष्ट विकत घ्यायची झाली तर आधी चार दुकानं हिंडतो, आजकाल तर आधी ऑनलाइन तसेच इ-कॉमर्स वेबसाइटवर दर पाहतो आणि मग ती गोष्ट जास्तीत जास्त फायदा होईल अशा किमतीला विकत घेतो. अशा पद्धतीने विविध वस्तू खरेदी करण्याची सवय आपण आपल्या मेंदूला लावतो. अभ्यास आणि परीक्षेची तयारी करण्याची प्रक्रियाही काहीशी अशाच पद्धतीची असते. मानवी मेंदूला आणि मनालाही एकदा आपण करत असलेल्या गोष्टीचा हेतू आणि कारण पटले की मन आणि मेंदू तशी सवय लावूनच घेतात.

आजकाल सर्व जण सकारात्मक मनस्थितीची गरज अधोरेखित करतात. परंतु सकारात्मक मनःस्थिती तयार होण्यासाठीचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे वैचारिक स्पष्टता. आपल्याला स्वतःची पूर्ण ओळख नसते, आपल्याला काय करायचे आहे हे निश्चित नसते तेव्हा एका अनिश्चिततेने, भविष्याच्या चिंतेने आपले मन व्यापलेले असते. याउलट तुमच्यामध्ये जसजशी वैचारिक स्पष्ट येऊ लागते तसतशी ही अनिश्चितता कमी होऊ लागते आणि तुमच्या दृष्टिकोनात सकारात्मकता येऊ लागते. अशा वेळी मग तुम्हाला प्रेरणा मिळवण्यासाठी, स्वत:ला अभ्यासाला तयार करण्यासाठी बाह्य गोष्टी जसे की, युट्युब व्हिडीओज, गाणी, चित्रपट, भाषणे या कशाची गरज पडत नाही.

(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com