
‘लक्ष्य’भेद : अभ्यासाची सुयोग्य पद्धत
- सोनल सोनकवडे
स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम अधिक असल्याने ‘तहान भूक हरपून अभ्यास केला पाहिजे’, ‘स्वत:ला अभ्यासात झोकून दिलं पाहिजे’, ‘अभ्यासाचं व्यसन तुम्हाला लागलं पाहिजे’, असं सगळं या अभ्यास करण्याच्या वर्षात तुमच्या कानावर पडत असतं, त्यांनी तुम्ही भारावूनही जाता. अशा वाक्यांतील शाब्दिक ऐवजी मतितार्थ लक्षात घ्या.
अभ्यास कितीही जास्त असला आणि कितीही स्वत:ला या सगळ्यात झोकून द्यावंसं वाटलं तरीही झोप, आहार आणि व्यायाम या गोष्टींशी तडजोड करू नका. कशाशी तडजोड करायचीच असल्यास दिवसातील अनावश्यक गोष्टी, मित्र-मैत्रिणींशी गप्पा मारण्यात जाणाऱ्या वेळेवर नियंत्रण आणून तो कमी करा.
शरीरावर ताण येईल, अतिश्रमाचा दुष्परिणाम होईल इतका अभ्यास करू नका. ही आयुष्य घडवणारी परीक्षा आहे. ते काही आयुष्याचं अंतिम आणि एकमेव ध्येय नाही. जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुमचं शरीर तंदुरुस्त आणि निरोगी असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्यही महत्त्वाचं असतं. झोप, आहार आणि व्यायाम यांचं एक शिस्तबद्ध वेळापत्रक पाळायला लागलात की साधारणपणे पहिल्या दोन महिन्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसतात. तुम्हाला कंटाळा किंवा आळस येण्याचं प्रमाण कमी होतं.
संतुलित आहाराइतकाच शरीराला व्यायाम गरजेचा असतो. दिवसाला साधारण ४० मिनिटं ते एक तास व्यायाम तुमच्या शरीराला आवश्यक असतो. ऊर्जा, क्षमता वाढवण्याचं आणि संतुलित राखण्याचं काम व्यायाम करत असतो.
स्पर्धा परीक्षा आणि त्यातही विशेषतः लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता लहरी आणि अनियमित अभ्यासाचा फायदा होत नाही.
दिवसातील ठराविक काळ मान खाली घालून, संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करूनच अभ्यास करावा लागतो. यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. सर्वसाधारणपणे रात्री १० वाजता झोपा आणि सकाळी सहा-साडेसहाला उठा. अशी शिस्त लावून घेतल्यास पुरेशी झोपही घेता येते आणि दिवसभर शारीरिक, मानसिक ऊर्जाही टिकून राहते.
एकदा तुमच्या झोपेचं वेळापत्रक पक्कं झालं की, मग बऱ्याचशा तक्रारी कमी होतात. अभ्यासातला दुसरा मोठा अडथळा असतो ते म्हणजे आपल्यापैकी अनेकांना अवेळी भूक लागते. आपल्यापैकी बरेच जण भूक लागली की खातात किंवा केवळ चविष्ट, चमचमीत आणि आवडेल ते खातात. या परीक्षांमध्ये अनेकवेळा तुमची शारीरिक तंदुरुस्ती निर्णायक ठरत असते त्यामुळे पुरेशा झोपेबरोबरच संतुलित आहारही तेवढाच महत्त्वाचा असतो.
तुम्हा एकावेळी अगदी भूक लागली म्हणून तडस लागेपर्यंत खाल्लं तर अशा खाण्याने तुम्हाला ते खाल्ल्यावर सुस्ती येते आणि अभ्यासाचे एक-दोन तास वाया जातात. त्यामुळे ठराविक कालांतराने थोडं थोडं खाण्याची सवय असू द्या. या बरोबरच आहारातून शरीराला आवश्यक असलेली सगळी पोषणमूल्ये म्हणजेच प्रथिने, जीवनसत्वे, मेद आणि कर्बोदके तुमच्या पोटात जातील आणि तुमची तब्येत तंदुरुस्त राहील याची खबरदारी घ्या.
(लेखिका ‘आयआरएस’ अधिकारी, गीतकार, गायिका आहेत.)