दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनो परीक्षेचं टेन्शन नका घेऊ; शिक्षक सांगतायत टिप्स

ssc hsc students
ssc hsc students

पुणे - तुम्ही दहावी किंवा बारावी बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत आहात का! अहो, मग जरा इकडे लक्ष द्या. बोर्डाच्या परीक्षेची तुमची तयारी सध्या अंतिम टप्प्यात असेल बरोबर ना ! मग, या वेळेत तुम्हाला काय करायला हवे, याबाबत खुद्द शिक्षकच तुम्हाला सांगत आहेत. राज्यात इयत्ता दहावी आणि बारावीत असणारे जवळपास ३० लाखांहून अधिक विद्यार्थी गेल्या वर्षभरापासून बहुतांश ऑनलाइन माध्यमातून अभ्यास करत आहेत. तर काही विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोचू न शकल्याने त्यांना शिक्षकांनी दिलेल्या ऑफलाइन शिक्षणावर अवंलबून राहावे लागले.

आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत एप्रिल-मे २०२१ मध्ये घेण्यात येणारी दहावी-बारावीची परीक्षा काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अंतिम टप्प्यातील तयारी करत आहेत. परीक्षा काही दिवसांवर आली असताना नेमका कसा आणि काय-काय अभ्यास करायचा, याबद्दल शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.

वेळेत प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करा
परीक्षा जवळ आली असताना अंतिम टप्प्यात विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तक नीट आणि पुन्हा-पुन्हा वाचायला हवे. बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेएवजी कृतिपत्रिका असतात. त्यामुळे पाठ्यपुस्तकातील धडा समजून घेऊन, त्यावर विचारलेल्या प्रश्नांवर लिहिणे अपेक्षित असते. त्यामुळे कोणत्याही गाइड किंवा सेल्फ स्टडीपेक्षा पाठ्यपुस्तक वाचले पाहिजे. तसेच, शिक्षण विभागाने दिलेल्या प्रश्नपेढीतील (क्वेश्चन बॅंक) प्रश्न वेळेत सोडविण्याचा सराव हवा. ही प्रश्नपेढी खूप अभ्यासपूर्ण असल्याने त्याचा विद्यार्थ्यांनी आवर्जून वापर करावा, असे कोथरूडमधील बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका गीतांजली बोधनकर यांनी सांगितले.

परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अंतिम टप्प्यात लक्ष देऊन आतापर्यंत शिकविलेल्या अभ्यासाची उजळणी करायला हवी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षभरात अनेक विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे लिखाणाची सवय सुटली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळेत लिखाण पूर्ण करण्याचा जास्तीत जास्त सराव करावा. त्याचप्रमाणे दिवसभरात किमान तीन-चार तास तरी नियोजनबद्धपणे अभ्यास करायला हवा. परीक्षा जवळ येईल, तसा हा वेळ वाढवत न्यावा.
- रोहिदास भारमळ,
मुख्याध्यापक, भावे प्रशाला

पालकांना सूचना
१) परीक्षेचे दडपण मुलांवर टाकू नका.
२) घरातील वातावरण प्रसन्न आणि मोकळे ठेवा.
३) कोरोनाचा संसर्ग आणि उन्हाचा कडाका वाढत असल्याने मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
४) मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या.
५) परीक्षेच्याकाळात मुले तणावमुक्त राहतील, यासाठी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com