'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा... | Success Story | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अप्पासाहेब सुभाष निकत
'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा...

'बी अल्वेज टॉपर' म्हणणारे पहिल्या प्रयत्नातच अयशस्वी होतात तेव्हा...

sakal_logo
By
अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्य सेवेच्या (State Service Examination) पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर बॅंकेतील नोकरी स्वीकारून लग्न केले. परंतु अधिकारी व्हायचं स्वप्न शांत बसू देत नसल्याने, संसाराचा गाडा हाकत स्पर्धा परीक्षेचा (Competitive exam) अभ्यास केला अन्‌ दुसऱ्या प्रयत्नात एकाचवेळी राज्य सेवेच्या तीन मुलाखतीसाठी निवड झाली. ही यशोगाथा (Success Story) आहे करमाळा (Karmala) तालुक्‍यातील अप्पासाहेब सुभाष निकत (Appasaheb Nikat) यांची. सध्या पदोन्नतीने ते भारतीय वनसेवा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा: एसटी महामंडळ विलिनीकरणात 'हे' अडथळे! निर्णयाची उत्सुकता

अप्पासाहेबांच्या आईचे जेमतेम दुसरीपर्यंत शिक्षण तर वडिलांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. ते पाटबंधारे विभागात कार्यरत असल्याने, बदलीच्या निमित्ताने या गावातून त्या गावात बदली होत असायची. त्यामुळे दहावीपर्यंत शिक्षण होईपर्यंत, दर दोन ते तीन वर्षाला शाळा बदलावी लागायची. त्यामुळे अप्पासाहेबांच्या शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो की, काय असा प्रश्न आई-वडिलांना सतावत राहायचा. परंतु घडायचं वेगळंच. ज्या शाळेत जाईल तिथे वर्गात गुणवत्तेत अव्वलस्थान कायम असायचं. त्यामुळे आई-वडिलांना वेगळाच आनंद मिळायचा.

अप्पासाहेब हे "बी अल्वेज टॉपर' असे सतत स्वतःला सांगत असे. ज्या क्षेत्रात जायचे तिथे आपणच अव्वलस्थानी राहिले पाहिजे यासाठी त्यांचे प्रयत्न कायमस्वरूपी असायचे. दहावीनंतर एका कार्यक्रमातील अधिकाऱ्याच्या भाषणामुळे आपणदेखील अधिकारी होऊ शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला होता. त्यासाठी ऍग्रीचे शिक्षण सोईस्कर असते, असे समजले होते. बीएस्सी ऍग्री करण्याचा निर्धार केला. त्यानुसार पुण्यातील शिवाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. सलग तीन वर्षे महाविद्यालयात प्रथम तर होतेच पण विद्यापीठातदेखील दुसरा नंबर होता. पहिली एक-दोन वर्षे गेल्यानंतर शेवटच्या वर्षात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. स्वयंअध्ययन करण्याचा निर्धार केला. त्यानुसार अंतिम वर्षाची परीक्षा देऊन घरी न जाता थेट कृषी विद्यापीठ, राहुरी गाठले. तिथेच एमएस्सी ऍग्रीसाठी प्रवेशदेखील घेतला अन्‌ अभ्यास सुरू केला.

तेथील वातावरणात खऱ्या अर्थाने त्यांचा स्पर्धा परीक्षेचा पाया भक्कम झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव व त्यांचे मार्गदर्शन घेऊन स्वयंअध्ययन सुरूच होते. 'हार अथवा अपयश' हा शब्द त्यांच्या नशिबात स्पर्धा परीक्षेच्या पूर्व परीक्षापर्यंत कधीच आला नव्हता. पहिल्या प्रयत्नात यशस्वी होईल, अशी आई-वडील, शिक्षक व मित्रांना अपेक्षा होती. परंतु, पूर्वपरीक्षेत अपयशास सामोरे जावे लागले. त्यामुळे मानसिक खच्चीकरण झाले. त्यातून स्वतःला सावरत, आपण हे करू शकतो, असा आत्मविश्वास ठेवून एक महिन्याच्या कालावधीने पुन्हा त्याच जोमाने अभ्यास सुरू ठेवला. पण एमपीएससीची कोणतीही जाहिरात नसल्याने, बॅंकिंग क्षेत्रातील परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुस्तके घेऊन अभ्यास केला अन्‌ या पहिल्या प्रयत्नात स्टेट बॅंक ऑफ इंडियात नोकरी मिळाली.

हेही वाचा: पहिली ते चौथीच्या शाळांचा बुधवारपर्यंत निर्णय !

या काळातच लग्न देखील झाले; पण स्पर्धा परीक्षा करण्याची असलेली जिद्द शांत बसू देत नव्हती. बॅंकेच्या नोकरीत मनही रमत नव्हते. अभ्यास सुरूच होता. नंतर दिलेल्या एमपीएससीच्या तिन्ही प्रकारच्या परीक्षेत मुलाखतीपर्यंत मजल मारली. राज्यसेवाला अवघ्या काही गुणांनी मुलाखतीत अपयश आले, पण इतर दोन दिलेल्या परीक्षेत लागोपाठ उपविभागीय वनाधिकारी व पोलिस उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली. वनविभागाची उपविभागीय वनाधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली. ठाणे, गडचिरोली या जिल्ह्यात उपविभागीय वनाधिकारी तर रायगडमध्ये विभागीय वन अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. नुकतीच पदोन्नतीने भारतीय वनसेवा अधिकारी (आयएफएस) म्हणून त्यंची नियुक्ती झाली आहे.

loading image
go to top