भारतातील सर्वात मोठ्या TCS चा नवा विक्रम; वर्षात दिल्या तब्बल 1,03,546 कर्मचाऱ्यांना नोकऱ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tata Consultancy Services

भारतातील सर्वात मोठ्या IT सेवा कंपनीनं एका वर्षात नोकऱ्या देण्याचा विक्रम केलाय.

भारतातील सर्वात मोठ्या कंपनीनं तब्बल 1,03,546 कर्मचाऱ्यांना दिल्या नोकऱ्या

भारतातील सर्वात मोठी IT सेवा कंपनी Tata Consultancy Services (TCS) नं एका वर्षात नोकऱ्या देण्याचा विक्रम केलाय. मार्च 2022 पर्यंत या कंपनीनं एका वर्षात 1,03,546 लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 40,000 लोकांना अधिक नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. या तिमाहीतील नोकऱ्यांची संख्या पाहिली, तर त्यातही टीसीएसनं विक्रम केलाय. या कंपनीनं एका तिमाहीत आतापर्यंतचे सर्वाधिक 35,209 कर्मचारी नियुक्त केले आहेत.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस फ्रेशर्सना पूर्ण संधी देत ​​आहे. हे त्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये TCS नं 78,000 नवीन लोकांना म्हणजेच फ्रेशर्सना संधी दिली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 40,000 अधिक आहे. कंपनीचा अ‍ॅट्रिशन दर एका तिमाहीत 17.4 टक्क्यांपर्यंत वाढला, जो वर्षाच्या सुरुवातीला 8.6 टक्के होता आणि डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 11.9 टक्के होता. टाटाच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या कंपन्यांमध्ये टीसीएसचं नाव आघाडीवर आहे. टाटा मोटर्स (Tata Motors) आणि टाटा पॉवर प्रमाणं टाटा कन्सल्टन्सी देखील कंपनीला भरपूर महसूल मिळवून देत आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं (Kotak Institutional Equities) एका नोटमध्ये अॅट्रिशनबद्दल सांगितलंय. आयटी उद्योगानं विक्रमी संख्येनं फ्रेशर्स जोडले असल्याने टॅलेंटची कमतरता कायम राहिलीय, असं या नोटमध्ये म्हंटलंय. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 592,195 होती. कंपनीला आशा आहे की, फ्रेशर्सच्या आगमनानं पुरवठ्यात सुधारणा होईल आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल, असं नमूद केलंय. 'मनीकंट्रोल'च्या अहवालात असं म्हंटलंय की, मार्च 2022 च्या तिमाहीच्या अखेरीपर्यंत TCS ची कमाई 50,591 कोटी रुपये झालीय. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत ते 15.8 जास्त होते. जर आपण संपूर्ण आर्थिक वर्षातील कमाई पाहिली तर ती 191,754 कोटी रुपये होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत 16.8 टक्के अधिक होती. कंपनीनं वाढीव महसुलात तब्बल $3.5 अब्ज कमावले आहेत. दरम्यान, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन (Rajesh Gopinathan) यांनी एका निवेदनात म्हंटलंय, आम्ही आर्थिक वर्ष 2022 मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी कर्मऱ्यांच्या संख्याही वाढवली जात आहे, असं त्यांनी नमूद केलं.