मेडिकल कॉलेजचं टेंडर महिनाअखेर; तब्बल 495 कोटींचा आराखडा तयार I Medical College | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Government Medical College

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून होणार आहे.

मेडिकल कॉलेजचं टेंडर महिनाअखेर; तब्बल 495 कोटींचा आराखडा तयार

सातारा : सर्व सातारकरांचे लक्ष लागलेल्या सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Satara Government Medical College) मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते झाले. प्रत्यक्ष इमारतीच्या ४९५ कोटींच्या सुसज्ज आराखड्यास नुकतीच वैद्यकीय संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे जानेवारीअखेर टेंडर प्रक्रिया सुरू होणार आहे. एकूण चार टप्प्यांत हे बांधकाम होणार असून, साधारण मार्चमध्ये प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होणार आहे. या बांधकामावर निरीक्षण करण्याची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर राहणार आहे.

सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते मागील आठवड्यात झाले आहे. त्याचे कामही वेगाने होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचा सुसज्ज असा एकूण ४९५ कोटी रुपयांचा इमारत बांधकाम आराखडा तयार झाला आहे. या आराखड्यास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सर्व संचालकांनीही मान्यता दिलेली आहे. बारामती व दिल्ली वैद्यकीय महाविद्यालयांच्या धर्तीवर हा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीचे विशेष आकर्षण राहणार आहे. आराखड्यातील बांधकामे चार टप्प्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षणाखाली होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. साधारण मार्चपर्यंत प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होण्याची शक्यता वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. आर. डी. चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: 'या दोन पंतप्रधानांच्या सुरक्षेतील हलगर्जीपणामुळं देशाचं मोठं नुकसान झालंय'

इमारतीच्या बांधकामाची ४९५ कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस काढण्यात येणार आहे. सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासाठी दिग्गज कंपन्या टेंडर प्रक्रियेत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळीही टेंडर आपल्या संबंधित कंपनीला मिळावे प्रयत्न करणार आहे. यासाठी या नेते मंडळीत चढाओढ लागण्याची शक्यता अधिक आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत असून, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे; पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांचे या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता दिसत नाही.

हेही वाचा: भाजप खासदाराच्या निधनानंतर बेळगावच्या हातून 'ही' संधी हुकली

सातारा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम आराखड्यास सर्व संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत बांधकाम टेंडर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एकूण ४९५ कोटींच्या इमारत आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने बांधकाम होणार आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निरीक्षण राहणार आहे.

-डॉ. आर. डी. चव्हाण, डीन, सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top