esakal | खोटे का बोलताय? MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती
sakal

बोलून बातमी शोधा

खोटे का बोलताय? MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती

आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन सरकारी नोकरीचे स्वप्न पाहताना पोटाला चिमटा घेऊन अभ्यास करणाऱ्या तरुणांना सरकार का खोटं बोलतंय, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे.

MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन सरकारी नोकरीचे (Government Job) स्वप्न पाहताना पोटाला चिमटा घेऊन अभ्यास करणाऱ्या तरुणांना सरकार का खोटं बोलतंय, असा प्रश्‍न सर्वांनाच पडला आहे. दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर पुढच्या वर्षीच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेत (State Service Pre-Examination) किमान पाचशेहून अधिक जागांची भरती निघेल, असा विश्‍वास तरुणांना होता. मात्र, सोमवारी (ता. 4) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) 290 पदांची राज्य सेवा पूर्वपरीक्षा-2021 ची जाहिरात काढून सर्वांनाच धक्‍का दिला. ही परीक्षा 2 जानेवारी 2022 रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांमध्ये होईल, असेही त्या नोटिफिकेशनमध्ये नमूद आहे. मंत्री, लोकप्रतिनिधींच्या ग्वाहीनंतरही त्यामध्ये ना जागा वाढल्या ना वयोमर्यादा वाढल्याचे दिसून आले.

हेही वाचा: Jobs : केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांत 3261 सरकारी नोकऱ्या!

कोरोनाच्या संकटामुळे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्‍त पदांमुळे पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती होऊनही निकाल प्रलंबितच राहिला. त्यातच पुन्हा मराठा समाजाचे "एसईबीसी'चे आरक्षण रद्द झाल्याने पुन्हा पेच निर्माण झाला आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार निकालात फेरबदल करावा लागला. त्यामध्येच दोन वर्षे निघून गेली. निकालाच्या प्रतीक्षेतील स्वप्निल लोणकरने कंटाळून आत्महत्या केली. त्याचा संपूर्ण रोष राज्य सरकारला घ्यावा लागला. त्यानंतर "एमपीएससी'च्या सर्व जागा भरल्या जातील, आयोगामार्फत मोठी पदभरती होईल, अशा वल्गना झाल्या. 31 जुलै, 30 सप्टेंबरही निघून गेला, मात्र, कार्यवाही शंभर टक्‍के झालीच नाही. दुसरीकडे, उमेदवारांना परीक्षेच्या सहा संधी देण्याचा निर्णय मात्र, यावेळी आवर्जून लागू करण्यात आला.

कोरोनाच्या संकटात सरकारमधील मंत्र्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या भरवाशावर भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणांच्या पदरी मात्र निराशाच पडली आहे. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सरकारने ज्याप्रकारे 15 दिवसांत कार्यवाही करण्यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली, त्याच पद्धतीने सरकारने गॅजेट नोटिफिकेशन काढून वयोमर्यादा वाढवावी, आणखी जागा वाढवून उर्वरित पदांचीही भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी तरुणांनी केली आहे. भविष्यात याच तरुणांचा रोष पत्कारावा लागू नये म्हणून सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Jobs : FSSAI मध्ये ग्रुप ए आणि इतर पदांची थेट भरती!

2022 पासून परीक्षेच्या सहा संधींची अट

खुल्या प्रवर्गातील उमदेवारांची वयोमर्यादा 38 तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 43 वयोमर्यादा ठरविण्यात आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे परीक्षा होऊ न शकल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना एक अथवा दोन वर्षापर्यंत वयोमर्यादा वाढवून मिळेल, असा विश्‍वास होता. मात्र, वयोमर्यादा वाढली तर नाहीच, दुसरीकडे पुढच्या राज्य सेवेच्या पूर्व परीक्षेपासून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षेच्या (प्रत्येक विभागातील (केडर) पदांसाठी मिळेल सहा संधी) सहा संधी देण्याचा निर्णय आवर्जून घेण्यात आला. दरम्यान, ओबीसी उमेदवारांना नऊ तर उर्वरित मागासवर्गीय उमेदवारांना अमर्याद संधी दिल्या जाणार आहेत. परंतु, मागासवर्गीय तरुणाने सहावेळा परीक्षा दिल्यानंतर तो सातव्या प्रयत्नात यशस्वी झाला आणि त्याला खुल्या पदावर संधी असल्यास ती मिळणार नसल्याचेही आयोतील सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, नुसते अर्ज करणाऱ्यांची संधी मोजली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठळक बाबी...

  • स्वप्नील लोकणकरच्या आत्महत्येनंतर झाली 15 हजार पदांची घोषणा

  • 30 सप्टेंबरपर्यंत शासकीय विभागांचे मागणीपत्र "एमपीएससी'ला जाईल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

  • 15 हजार नव्हे, 18 ते 20 हजार पदांची होईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरती; राज्यमंत्री भरणे यांची माहिती

  • कोरोनामुळे दोन वर्षांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत; दोन वर्षे वयोमर्यादा वाढविण्याचीही मंत्र्यांची ग्वाही

  • वयोमर्यादाही वाढली नाही आणि 15 ते 20 हजारांची नव्हे, तर 290 जागांचीच "एमपीएससी'ने काढली जाहिरात

  • मंत्री, लोकप्रतिनिधीच्या भरवशावर वाट पाहणाऱ्या उमेदवारांची निराशाच; जागा अन्‌ वयोमर्यादा वाढविण्याची मागणी

loading image
go to top