esakal | करिअरपुरक डिप्लोमाचा ट्रेंड : पुणे विद्यापीठात ९३ अभ्यासक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Pune University

करिअरपुरक डिप्लोमाचा ट्रेंड : पुणे विद्यापीठात ९३ अभ्यासक्रम

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

पुणे : पारंपारिक अभ्यासक्रमांचा उपयोग रोजगार मिळविण्यासाठी होतोच असे नाही. दिवसेंदिवस त्यांची रोजगार देण्याची क्षमताही कमी होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठासह खासगी संस्थांनीही पदविका अभ्यासक्रम सुरू केल्याचे दिसते. ज्यातून विद्यार्थ्याला कौशल्याधारित शिक्षणाद्वारे थेट रोजगाराशी जोडता येते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे ९३ प्रकारचे पदविका अभ्यासक्रम चालविले जात आहे.

बहुतेक पदविका अभ्यासक्रम हे त्या विषयाची उद्योगांना असलेली गरज ओळखून विकसित केले आहेत. शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहीते म्हणाले, ‘‘नियमितच्या अभ्यासक्रमांद्वारे उद्योगांना किंवा बाजारामध्ये अपेक्षीत कौशल्य मिळेलच असे नाही. तसेच त्यांचा अभ्यासक्रम पाच वर्षांतून अद्ययावत केला जातो. त्यामुळे तो काळानुरूप असेलच असे नाही. अशा वेळी पदवी, कौशल्य आणि अनुभव देणाऱ्या पदविका अभ्यासक्रमांची गरज आहे. विद्यापीठात असे अभ्यासक्रम उपलब्ध असून, त्याची गरजही जास्त आहे.’’

विद्यापीठासह खासगी अभिमत विद्यापीठे, प्रगत संगणन विकास केंद्र (सी-डॅक), खासगी संस्थांनीही असे पदविका अभ्यासक्रम सुरू केले आहेत. नोकरीच्या अपेक्षेने त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.

हेही वाचा: 'नवोदय' प्रवेश परीक्षेसाठी अधिसूचना जारी; 'या' दिवशी होणार परीक्षा

पदविकांची आवश्यकता का?

 • उद्योगांची गरज दिवसेंदिवस बदलत आहे

 • पारंपारिक अभ्यासक्रमांच्या स्वतः मर्यादा

 • विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट आणि हार्ड या दोन्ही कौशल्यांचा अभाव

 • प्रत्यक्ष क्षेत्रातील कार्यानुभव पारंपारिक अभ्यासक्रमांत नाही

पदविका अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये

 • अगदी ३ महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यतचा अभ्यासक्रम कालावधी

 • उद्योगांना अपेक्षीत कौशल्याच्या आधारित अभ्यासक्रम

 • बहुतेक अभ्यासक्रमांमध्ये इंटर्नशीपचा समावेश

 • प्रत्यक्ष त्या क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांद्वारे शिकवण्यात येते

 • बदलत्या काळाची गरज ओळखून रचना

अभ्यासक्रमांच्या मर्यादा :

 • शैक्षणिक कालावधी अल्प असल्यामुळे पूर्ण कौशल्य प्राप्त होईल, असे नाही

 • काही अभ्यासक्रम विनाअनुदानित असल्यामुळे शैक्षणिक शुल्क मोठ्या प्रमाणावर

 • प्रवेश संख्या मर्यादित

हेही वाचा: सी-डॅकतर्फे ऑनलाइन PG, Diploma अभ्यासक्रम; २९ जुलै अंतिम मुदत

विद्यापीठ कॅंपसमधील अभ्यासक्रम :

१) विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखा : २०

२) मानव्य विज्ञानशाखा : ७२

३) आंतरविद्याशाखीय : १

४) सर्वाधिक पदविका अभ्यासक्रम असलेला विभाग : परदेशी भाषा विभाग (२५)

''माझे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले असून, त्यात प्रत्यक्ष उद्योगांचा अनुभव मिळालाच असे नाही. पदविका अभ्यासक्रमामुळे अधिकची पदवी, तर मिळते त्याचबरोबर नवीन कौशल्यामुळे नोकरी मिळण्याची शक्यताही वाढते. तसेच त्यात पुढच्या हुद्द्यावरही काम करता येते. नोकरीच्या संधीसाठी असे पदविका अभ्यासक्रम केव्हाही चांगले.''

- सौरभ रसाळ, यांत्रिकी अभियंता

loading image