esakal | वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी
sakal

बोलून बातमी शोधा

ips neeraj

वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबावर ओढावलेली वेळ, जबाबदारी अंगावर पडल्यानंतर ती सांभाळून ध्येयापर्यंतचा प्रवास संघर्षमय असाच होता. पोलिस अधिकारी होण्यासाठी लाखोंची नोकरी सोडली आणि अभ्यास सुरु केला. 

वडिलांच्या हत्येनंतर 22 लाखांची नोकरी सोडून बनला IPS; पोलिस दलातील सुपरहिरोची कहाणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - आयुष्यात एखादा क्षण असा येतो ज्यामुळे सगळं जीवनच बदलून जातं. एखादी घटना मनावर आघात करते त्यातून सावरणं कठीण असतं. मात्र तरीही त्यावर मात करत यशाची शिखरे पादाक्रांत केली जातात. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर असंच यश मिळवलेल्या नीरज जादौन यांची कहाणी प्रेरणा देणारी आहे. वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबावर ओढावलेली वेळ, जबाबदारी अंगावर पडल्यानंतर ती सांभाळून ध्येयापर्यंतचा प्रवास संघर्षमय असाच होता. पोलिस अधिकारी होण्यासाठी लाखोंची नोकरी सोडली आणि अभ्यास सुरु केला. सुरुवातील आलेल्या अपयशाने खचून न जाता अखेर यश मिळवलंच. त्यांच्या या यशात कुटुंबातील इतर सदस्यांनी मोठी भूमिका बजावली. 

उत्तर प्रदेशात जालोन जिल्ह्यातल्या नौरैजपूर इथ राहणाऱ्या नीरज यांना पोलिस दलामध्ये सुपरहिरो म्हणून ओळखलं जातं. बंगरुळुतील एका कंपनीत नोकरी करणाऱ्या नीरज यांचा इथपर्यंतचा प्रवास संघर्षाने भरलेला होता. आई वडिलांचे शिक्षण 12 वी पर्यंत झालेले होते. त्यात 5 भावंडांमध्ये मोठे असल्याने कुटुंबाची जबाबदारीही लवकर खांद्यावर आली. कानपूर इथं शिक्षण झाल्यानंतर नोएडात त्यांना नोकरी मिळाली. वर्षभर त्याठिकाणी नीरज यांनी काम केलं. तेव्हाच त्यांच्या वडिलांच्या हत्येनं कुटुंबावर आभाळ कोसळलं. 

हे वाचा - अपयश आल्यावर वडील म्हणाले,'फक्त शेत विकलंय अजून किडनी आहे'; मुलगा दुसऱ्याच प्रयत्नात झाला IPS

वडिलांची हत्या झाली तेव्हा नीरज जादौन बंगरुळुतील कंपनीत वार्षिक 22 लाख रुपये पगाराची नोकरी करत होते. वडिलांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी आणि न्याय मिळावा यासाठी न्यायालयाच्या पायऱ्या झिजवल्या. न्यायालयात खटला सुरु होता. मात्र यामध्ये म्हणावा तसा तपास होत नव्हता. पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य होत नसल्याची भावना त्यांच्या मनात राग निर्माण करत होती. तेव्हाच त्यांनी आयपीएस होण्याचा निर्णय घेतला. 

नीरज यांच्या वडिलांची 6 डिसेंबर 2008 रोजी हत्या करण्यात आली होती. शेतीच्या वादातून झालेल्या या हत्येनंतर कुटुंबाची जबाबदारी नीरज यांच्यावर आली. तेव्हा नीरज 26 वर्षांचे होते. नीरज म्हणतात की,'मी नोकरी करत होतो तेव्हा दुसऱ्या बाजुला न्यायालयात खटला सुरु होता. चांगल्या पगाराची नोकरी होती मात्र वडिलांच्या हत्येच्या प्रकरणावेळी पोलिस प्रशासनासमोर भीक मागण्याची वेळ आली. माझ्या कुटुंबाला आरोपी धमकावण्याचा प्रयत्न करत होते. यामुळे सतत भीतीच्या छायेखाली रहावं लागत होतं. 

आणखी वाचा - बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS

नीरज यांनी त्यांच्या लहान भावाला नोकरी मिळाल्यानंतर युपीएससीचा अर्ज भरला. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत धडक मारली. मात्र तिथं त्यांना अपयश आलं. पुन्हा प्रयत्न करत 2012 च्या परीक्षेत त्यांना 546 वा क्रमांक मिळाला. त्यात त्यांना इंडियन पोस्टमध्ये सर्विस मिळाली. मात्र पोलिस सेवेत जाण्याची त्यांची इच्छा अपूर्ण होती. 2014 मध्ये त्यांनी जोरदार प्रयत्न करत देशात 140 वा क्रमांक पटकावला आणि मुलाखतही यशस्वीपणे पार पडली. पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर काही हल्लेही झाले. त्यांच्या धाडसी निर्णयांमुळे आणि कामामुळे हे हल्ले होत असतं. त्यांनी पोलिसात सेवा बजावताना सामाजिक कामेही केली. आजही ते समाजसेवेसाठी सदैव तत्पर असतात.