
गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास होणाऱ्या आयपीएस आणि आएएस अधिकाऱ्यांची कहाणी इतरांना प्रेरणा देते.
नवी दिल्ली - गरीबीतून संघर्ष करत देशातील सर्वात मोठी आणि कठीण परीक्षा पास होणाऱ्या आयपीएस आणि आएएस अधिकाऱ्यांची कहाणी नेहमीच इतरांना प्रेरणा देते. ज्या गावात, भागात गेल्या पाच दशकात कोणी आयएएस झालं नव्हतं त्या भागात अनेक सोयी सुविधांचा अभाव असतानाही कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर इंद्रजीत महथा युपीएससी पास झाले. एका सामान्य अशा शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या इंद्रजीत यांच्या वडिलांनी मुलाच्या शिक्षणासाठी घरचा उदरनिर्वाह ज्याच्यावर चालत होता ती शेती विकली. वडिलांनी हे करत असताना मुलाला शिकण्यासाठी काही कमी पडू नये याची काळजी घेतली. त्याला युपीएससीसाठी जे हवं ते दिलं. कुटुंबाने केलेल्या या त्यागाची किंमत ओळखून असलेल्या इंद्रजीत यांनी दुसऱ्याच प्रयत्नात 2008 मध्ये युपीएससीमध्ये यश मिळवलं.
आणखी वाचा - बसमधील एका घटनेनं बदललं आयुष्य आणि बनली IPS
IPS इंद्रजीन महथा झारखंडमधील बोकारो जिल्ह्यातील साबरा नावाच्या खेड्यात राहत होते. एक मातीनं बांधलेलं कच्च्या विटांचं कौलारु घर हे त्यांचं राहण्याचं ठिकाण. घर पडायच्या अवस्थेला आलं तेव्हा त्यांची आई आणि दोन्ही बहीणी मामाकडे गेल्या. शिक्षणामुळे इंद्रजीत यांनी घर सोडलं नाही. त्याचवेळी वडिलांनी त्यांच्या मदतीने पुन्हा घराची डागडुजी केली. ते विटा द्यायचे आणि वडील त्या बांधायचे. शिकत असताना त्यांना जिल्हा प्रशासन असा धडा होता. तो झाल्यानंतर इंद्रजीत यांनी शिक्षकांना विचारलं होतं की, जिल्ह्याचा सर्वात मोठा अधिकारी कोण? तेव्हा शिक्षकांनी जिल्हाधिकारी असं उत्तर दिलं होतं. त्यावर जिल्हाधिकाऱ्याला कोणकोणते अधिकार असतात याचीही माहिती दिली. त्याचवेळी इंद्रजीत यांनी मोठा होऊन जिल्हाधिकारी व्हायचं असं ठरवलं.
आणखी वाचा - ज्या कंपनीची मिळालेली नोकरी सोडली तिथंच केलं मार्गदर्शन, वाचा IPS अधिकाऱ्याची कहाणी
आपल्या परिस्थितीबद्दल सांगताना इंद्रजीत म्हणतात की, एवढे पैसे नव्हते की नव्या आवृत्तीची पुस्तके खरेदी करता येतील. जुन्या आवृत्त्या रद्दीमध्ये विकल्या जायच्या. त्या खरेदी करून परीक्षेची तयारी केली. पदवीनंतर दिल्लीला येऊन युपीएससीचा अभ्यास सुरू केला. इथला खर्च करण्यासाठी वडिलांनी जवळची 80 टक्के शेती विकली. इंद्रजीत यांना याची जाणीव होती आणि त्यातूनच यशाकडे जाण्याची जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली होती.
हे वाचा - वडील चालवायचे चहाचं दुकान, मुलगी झाली IAF फायटर पायलट
पहिल्यांदा अपयश आलं तेव्हा वडिलांनी इंद्रजीत यांना धीर दिला. वडिल म्हणाले की आता फक्त शेत विकलंय तुला शिकवण्यासाठी मी किडनीही विकू शकतो. तु पैशाची काळजी करू नको जेवढं हवं तेवढं शिक. वडिलांच्या तोंडून हे शब्द ऐकून तिथंच नतमस्तक झालेल्या इंद्रजीत यांनी पुन्हा जोराने अभ्यास केला. शेवटी दुसऱ्या प्रयत्नात यशाचं शिखर गाठत आयपीएस झाले.