UPSC 2019 - शेतकऱ्याचा मुलगा पहिला आला; वाचा कसा होता प्रदीपचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये हरियाणातील प्रदीप सिंहने पहिली रँक मिळवली.

चंदिगढ - केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेमध्ये हरियाणातील प्रदीप सिंहने पहिली रँक मिळवली. त्यापाठोपाठ जतीन किशोरी याने दुसरा तर प्रतिभा वर्मा हिने तिसरा क्रमांक पटकावला. सोनिपत जिल्ह्यातील तेवडी गावात राहणारा प्रदीप हा शेतकरी कुटुंबातील आहे. त्यानं चौथ्या प्रयत्नात यशाला गवसणी घातली आहे. दोन वेळा तर प्रदीप सिंहला पूर्व परीक्षा पास होता आलं नव्हतं. तर गेल्या वर्षी 260 वी रँक मिळवली होती. प्रदीपने हरियाणात काम करण्यासाठी प्राधान्य दिलं आहे. तसंच आपल्याच प्रदेशात राहून लोकांची सेवा करण्याची त्याची इच्छा आहे. प्रदीपचे वडील सुखबीर सिंह हे दोन वेळा सरपंचही होते. प्रदीपने गेल्या वर्षी युपीएससी परीक्षा पास केल्यानंतर 260 वी रँक मिळाली होती. त्यानंतर फरीदाबादमध्ये आयआरएसचं ट्रेनिंग सुरू होतं. तरीही प्रदीपने अभ्यास आणि युपीएससीची तयारी बंद केली नव्हती. 

युपीएससीचा निकाल लागल्याची माहिती प्रदीपला मित्राने फोनवरून दिली. आपण पास झालो पण टॉप आलो यावर त्याचा सुरुवातीला विश्वास बसला नाही. तेव्हा पुन्हा निकाल पाहिला आणि त्यावेळी झालेला आनंद अवर्णनीय होता. सर्वात आधी घरी वडिलांना फोन करून याची माहिती दिली. वडिलांनासुद्धा प्रदीपने पहिली रँक मिळाल्याचं सांगितलं नव्हतं. घरी आल्यानंतरच त्याने टॉप आल्याचं सांगितलं. 

हे वाचा - UPSC मध्ये पास झाले राहुल मोदी; रँक 420

याआधी प्रदीप इन्कम टॅक्स विभागात निरीक्षक होता. आपल्या इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल सांगताना तो म्हणाला की, दहावी - बारावी झाली तेव्हा कधीच युपीएससीचा विचार केला नव्हता. 2015 मध्ये नोकरी करत असताना मित्र आणि वडिलांनी यासाठी प्रोत्साहन दिलं. नोकरीसह तयारी करणं कठीण होतं पण त्यासाठी टाइम मॅनेजमेंट केलं. 

हे वाचा - UPSC 2019 : प्रदीप सिंहच्या वडिलांनी घर-जमिन विकली; मुलगा झाला IAS

दिल्लीच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये डेस्कवर नोकरी होती. सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत काम आवरून अभ्यास करायचो. जेवणाच्या वेळेत लवकर आटोपलं की मिळालेल्या वेळेत अभ्यास करत होतो असंही प्रदीपने सांगितलं. अभ्यास करताना कधी तासांचा विचार केला नाही. आठवड्याचं नियोजन केलं होतं. त्यानुसार अभ्यास करत होतो. एखाद्या वेळी अभ्यास करता आला नाही तर दुसऱ्या दिवशी तो पूर्ण करत असे. आठवड्याला ठरलेला अभ्यास पूर्ण करायचाच असा निश्चय केला होता. त्यामुळेच हे यश मिळवता आलं असं प्रदीपने सांगितलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: upsc success story pradip singh from hariyana first rank in india