esakal | कर्नाटकचे रहिवासी, शिक्षण महाराष्ट्रात; विद्यानिधी मिळणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

कर्नाटकचे रहिवासी, शिक्षण महाराष्ट्रात; विद्यानिधी मिळणार का?

कर्नाटकचे रहिवासी, शिक्षण महाराष्ट्रात; विद्यानिधी मिळणार का?

sakal_logo
By
अमोल नागराळे

निपाणी : राज्य शासनाकडून आता शाळा व महाविद्यालयातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना विद्यानिधी योजनेंतर्गत (vidyanidhi scheme) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. तशी घोषणा करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांच्या हस्ते योजनेची अंमलबजावणी झाली आहे. मात्र निपाणीसह सीमाभागातील कर्नाटकचे रहिवासी असणारे पण नजिकच्या महाराष्ट्रात शिक्षण घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याबद्दल कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यावर अधिकाऱ्यांनीही निपाणीसह सीमाभागात ही अडचण उदभवणार असल्याचे सांगत त्याबद्दल अद्याप सरकारचे स्पष्ट आदेश नसल्याचे सांगितले.

हेही वाचा: वाहरे पठ्ठ्या म्हणून शाबासकी द्याल का!

ज्या विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष शेतात काम करतात, अशा शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची अनोखी योजना मुख्यमंत्री बोम्मई यांनी राज्यात पहिल्यांदाच राबवली आहे. देशातील अन्य राज्यातही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना राबविलेली नाही. आजवर गुणवत्तेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा एससी, एसटी वर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना राबवली गेली आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देण्याची योजना पहिल्यांदा राज्य सरकारने राबवली आहे. योजनेंतर्गत शाळा व महाविद्यालयात शिकणाऱ्यां शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

योजना लक्षवेधी असली तरी निपाणीसह सीमाभागात त्याची अंमलबजावणी करताना अडथळे येणार आहेत. कारण निपाणीसह सीमाभागातील असंख्य शेतकऱ्यांची मुले नजिकच्या महाराष्ट्रात शिक्षण घेतात. अनेक शेतकरी कर्नाटकचे रहिवासी आहेत, येथे असणारी शेती ते स्वतः करतात. त्यांची मुले मात्र नजिकच्या कोल्हापूर, कागल, गडहिंग्लज, इचलकरंजीसह महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेतात. अशा मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार की नाही? असा प्रश्न शेतकरी पाल्यांसह कृषी अधिकाऱ्यांनाही पडला आहे. जर कर्नाटकचे रहिवासी असून आणि पालक शेतकरी असतानाही केवळ महाराष्ट्रात शिक्षण घेत असल्याच्या कारणातून अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही तर मात्र सीमाभागात योजना यशस्वी ठरणार नाही. यामुळे अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

विद्यानिधी शिष्यवृत्ती योजनेचा प्रारंभ झाला आहे. मात्र अद्याप योजनेची अंमलबजावणी करताना लागू असणारी नियमावली प्राप्त झालेली नाही. शेतीकाम करीत असणाऱ्यां शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती देणे मुख्य उद्देश आहे. मात्र निपाणी भागातील असंख्य शेतकऱ्यांचे पाल्य महाराष्ट्रात शिक्षण घेतात. त्यांना शिष्यवृत्ती मिळणार की नाही हे स्पष्ट नाही.

-पुरुषोत्तम पिराजे, कृषी अधिकारी, निपाणी

loading image
go to top