प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास करा!

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात शिरल्यावर विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडतो. तसा तो माझाही उडाला होता.
Question Paper Study
Question Paper StudyEsakal

- विजय बामणे, तलाठी - सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बावची या छोट्याशा गावात माझे शालेय शिक्षण झाले. वडील प्राथमिक शिक्षक आणि आई गृहिणी. मिरजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रशासकीय सेवेत रुजू व्हावं, असं मला वाटलं आणि त्यानंतर अभ्यास सुरू केला.

स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात शिरल्यावर विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडतो. तसा तो माझाही उडाला होता. मात्र, मी प्रश्‍नपत्रिकांना गुरू मानले. एकाच वेळी विविध प्रकारचे अभ्यासाचे साहित्य बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे नेमका अभ्यास कशातून करावा? हे विद्यार्थ्यांना कळत नाही.

मी अभ्यास करायला सुरुवात केल्यावर सुरुवातीपासूनच प्रश्‍नपत्रिका चाळत होतो. एमपीएससीच्या संकेतस्थळावर मागील वर्षांच्या प्रश्‍नपत्रिका उपलब्ध आहेत. त्या काळजीपूर्वक बघायला हव्यात. प्रश्‍नपत्रिकेचा अभ्यास केल्याने कोणत्या घटकांवर कशा पद्धतीचे प्रश्‍न विचारले जातात, हे आपल्याला कळते. त्यामुळे गोंधळ उडत नाही. काही प्रश्‍न ‘ट्विस्ट’ करून विचारले जातात. त्यामुळे प्रश्‍नाला कशा प्रकारचे वळण मिळाले आहे?

त्याचे नक्की कशा प्रकारे उत्तर देणे अपेक्षित आहे? याचा अंदाज आपल्याला घेता येतो. प्रश्‍नपत्रिकांप्रमाणेच अभ्यासक्रमाचाही अभ्यास करणे आवश्‍यक आहे. अभ्यासक्रमात बऱ्याच गोष्टी दिलेल्या असतात. त्याचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर, त्या त्या घटकाचे ‘वेटेज’ म्हणजे तो किती मार्कांना परीक्षेत विचारला जाऊ शकतो? हे आपल्याला कळेल. त्यावरून त्याला किती महत्त्व द्यावे? हे कळते.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आयोग वस्तुनिष्ठ प्रश्‍न विचारतो. त्यामुळे त्या पद्धतीने उत्तरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप भारंभार माहिती पाठ करण्यात वेळ वाया घालवू नका, तर अचूकपणे तेवढ्याच प्रश्‍नाचे नेमके उत्तर लक्षात ठेवा. गणित, बुद्धिमत्तेसारख्या विषयाचे प्रश्‍न सोडवताना ‘ट्रिक्स’ वापरण्याचा प्रयत्न करा. केवळ लक्षात ठेवू नका, तर प्रत्येक मुद्दा समजून घ्या. तसे झाले, तर काहीच अवघड जाणार नाही.

माझा भाऊ पोलिस कॉन्स्टेबल आहे आणि बहीण आता स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. माझ्या संघर्षात मला आई-बाबा आणि भावंडांनी खूप पाठिंबा दिला. त्यामुळे माझा अभ्यास आताही सुरूच आहे. मी पोलिस उपनिरीक्षक पदासाठीचीही परीक्षा दिली असून, त्यातही यश मिळण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com